Nashik Shocker: इगतपुरी येथे गरोदर आदिवासी महिलेला झोळीतून 2.5 किलोमीटरपर्यंत नेले; रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध नसल्याने झाला मृत्यू
Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

'निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान', अशा जाहिराती करून राज्य सरकार स्वतःच स्वतःची पाठ थोपटत असले तरी, इगतपुरीच्या (Igatpuri) आदिवासी पाडांवर अद्याप विकास पोहोचलेला नाही, हे मंगळवारी स्पष्ट झाले. असह्य प्रसूती वेदनांनी ग्रासलेल्या गरोदर महिलेला योग्य रस्ता किंवा वाहतुकीची व्यवस्था नसल्याने गावकऱ्यांनी झोळीतून अडीच किलोमीटरपर्यंत नेले. त्यानंतर दोन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच उपलब्ध नसल्यामुळे तिला तिसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. परंतु, इतक्या कष्टाने झालेला प्रवास आणि रुग्णालयात दाखल होण्यास उशीर झाल्यामुळे महिलेला जीव गमवावा लागला.

वनिता भगत ही पीडित महिला इगतपुरीच्या तळोघ ग्रामपंचायतीच्या दुर्गम जुनावणेवस्ती येथील आहे. या आदिवासी वस्तीतील ग्रामस्थांना तळोघ येथील मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी कच्च्या रस्त्याने अडीच किलोमीटर पायपीट करावी लागते. पावसामुळे हा कच्चा रस्ता नेहमीच चिखलमय असतो. वनिता भगत यांना मंगळवारी पहाटे 2.30 वाजता झोळीतून तळोघ येथे नेण्यात आले. तेथून त्यांना वाहनाने इगतपुरी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.

मात्र तेथे एकही डॉक्टर उपस्थित नसल्याने त्यांना पुन्हा वाहनातून वाडीवर्‍हे येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, येथेही केवळ परिचारिकाच उपस्थित होत्या. वनिता यांची प्रकृती पाहून त्यांनी तिला नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले. वाडीवर्‍हे येथून ते नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पोहोचले तोपर्यंत पहाटेचे चार वाजले होते. (हेही वाचा: Palghar: नदीवर पूल नसल्याने पालघर मध्ये गर्भवतीला पुराच्या पाण्यातून जाण्याची आली वेळ)

तिथे वनिता यांच्यावर सुमारे दीड तास उपचार चालले मात्र यावेळी त्यांचा मृत्यू झाला. अखेर तितकीच पायपीट करून वनिता यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घरी न्यावा लागला. मृतदेह नाशिकहून वाहनाने इगतपुरी तालुक्यात आणण्यात आला. त्यानंतर तळोघ ते जुनावणेवस्तीपर्यंत पुन्हा झोळीतून मृतदेह नेण्यात आला. दरम्यान, जुनावणेवस्तीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने शाळकरी मुले, वृद्ध, गरोदर महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जुनवेनवाडीपर्यंतचा रस्ता तातडीने करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सीताराम गावंडा यांनी केली आहे.