नाशिक शहरामध्येही मॉल्समध्ये मोफत पार्किंग; महापालिकेत प्रस्ताव मंजूर
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबई, पुणे, नाशिक शहरांसारख्या मेट्रो सिटीमध्ये आजकाल वाहनांची संख्या वाढल्याने ट्राफिकची समस्या बिकट होत चालली आहे. रस्त्यांवर बेशिस्त पद्धतीने केलेल्या पार्किंगमुळे पादचार्‍यांसह वाहतुकीमध्येहीअडथळा निर्माण होतो. मात्र आता यावर तोडगा काढण्यासाठी शहरांमध्ये मॉलमध्ये मोफत पार्किंगची (Free Parking) सोय सुरू करण्यात आली आहे. आधी पुणे आणि आता नाशिक महापलिकेत (Nashik Municipal Corporation) अशाप्रकारचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

मागील आठवड्यात पुणे शहरात आणि आता नाशिकमध्ये मॉलमध्ये वाहनांना मोफत पार्किंग देण्यात येणार आहे. महापौर रंजना भानसी यांनी हा प्रस्ताव मंजूर केला आहे. शहरातील सर्व मॉल्सना नोटिसा बजावून त्यांना नागरिकांसाठी विनाशुल्क पार्किंग करण्याचे आदेश द्यावेत, असे निर्देशही महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत. पुणे: मॉल्स-मल्टिप्लेक्स येथे नागरिकांना मिळणार मोफत कार पार्किंग

पुणे शहरात पार्किंगचा प्रश्‍न बिकट झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर शहर सुधार समितीने शहरातील सर्व मॉल्समध्ये मोफत पार्किंग करण्याचा निर्णय घेतला. त्याला महासभेने मंजुरी दिली. त्यामुळे पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्येही हा निर्णय घ्यावा असा प्रस्ताव शिवसेनेकडून करण्यात आला आहे.