आयएएस अधिकारी असलेले नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे म्हणजे एक धडाकेबाज व्यक्तिमत्व. अर्थात, त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे त्यांची कारवाईसुद्धा धडाकेबाजच असते. नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीलाच नाशिककरांना त्याची प्रचिती आली. आयुक्त तुकारम मुंढे हे कालिका मंदिरात आरतीला आले. त्यांनी देवीची मनोभावे आरती केली. पण, परत जाताना मंदिर परिसरातील स्टॉलधारकांना चागलाच प्रसाद दिला. राज्यात प्लास्टिकबंदी आहे. मात्र, मंदिर परिसरातील प्रसाद स्टॉलवर प्लास्टिकविक्री आणि त्याचा वापर सर्रासपणे केली जात आहे. हे पाहून आयुक्त चांगलेचत चिडले. त्यांनी थेट कारवाईचा बडगा उगारला. आयुक्तांनी केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'मुळे स्टॉलधारक मात्र चांगलेच गर्भगळित झाले.
आयुक्त मुंढेंनी मंदिर परिसरात प्लॅस्टिक विक्री करणाऱ्या सर्व प्रसाद स्टॉल्सची प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी अचानक केली. या वेळी त्यांना राज्यभरात बंदी असतानाही इथे प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणावर विकले जात असल्याचे आढळले. त्यामुळे भडकलेल्या मुंढे यांनी संध्याकाळपर्यंत प्लॅस्टिकची विक्री आणि वापर त्वरीत बंद करा. अन्यथा, दुकानेच हटवू. तसेच, मंदिर परिसरात अतिक्रमण केल्यासही कारवाई करु असा सज्जड इशारा दिला. आयुक्तांनी अचानक केलेल्या तपासणीमुळे स्टॉलधारक मात्र चांगलेच गर्भगळित झाले.
कालिका माता म्हणजे नाशिकची ग्रामदेवता. अवघे नाशिककर कालिका मातेच्या मंदिरासाठी भक्तीभावाने येतात. दरम्यान, मंदिर व्यवस्थापनाने आयुक्त मुंढे यांना कालिका मातेच्या आरतीसाठी निमंत्रण दिले. निमंत्रणाचा आगत्याने स्वीकार करत मुंढे यांनी आरतीला हजेरीही लावली. सकाळी ८.३० ला ते अरतीसाठी मंदिरात दाखल झाले. मात्र, मंदिरात प्रवेश करतानाच प्लॅस्टिकच्या पिशव्या त्यांच्या नजरेला पडल्या. त्यामुळे भडकलेल्या मुंढे यांनी स्टॉलधारक आणि प्रशासनाचीही चांगलीच खरडपट्टी काढली.