नाशिक: लासलगाव बाजारात कांद्याचा भाव शंभरी पार; 4 वर्षातील उच्चांकी दर
कांदा (Photo Credit : ThoughtCo)

कांदा (Onion) विक्रीतील देशातील अग्रेसर बाजारपेठ अशी ओळख असलेल्या लासलगाव बाजारात (Lasalgaon Onion Market) कांद्याच्या भावाने मोठी उसळी घेतली आहे. लासलगाव येथील शेती उत्पादन बाजार समितीच्या (APMC Market) बाजारात गुरुवारी (19 सप्टेंबर) रोजी कांद्याचा लिलाव पार पडला. या लिलावात मागील 4 वर्षातील सर्वोच्च असा प्रति 100 किलो मागे 4500 रुपये इतका दर रेकॉर्ड झाला आहे. परिणामी येत्या काही दिवसात मुंबई सह अन्य बाजरपेठेत देखिले कांद्याचा दर वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी सप्टेंबर 2015 साली कांद्याचा प्रति 100 किलो मागे 4300 रुपये तर ऑगस्ट 2015 मध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजे प्रति क्विंटल 5,700 रुपये इतका दर रेकॉर्ड झाला होता.

(हे हि वाचा- कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकर्‍याची कोंब आलेल्या कांद्याच्या ढिगार्‍यावरच आत्महत्या)

प्राप्त माहितीनुसार, मागील आठवड्यापर्यंत नाशिक मध्ये कांद्याचा भाव 35 रुपये किलो इतका होता पण या साठवड्याच्या सुरुवातीलाच दारात इतकी मोठी उसळी आली की आता थेट 50 रुपये किलो वर पोहचली होती. या दरवाढीमागील कारणांचा आढावा घेतल्यास कांदा पुरवठयात घट झाल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. लासलगाव येथील बाजरात जिथे दिवसा तब्बल 15,000 क्विंटल इतका कांदा दरदिवशी येत होता तिथे आता केवळ 10 ते 12 हजार कांदा येत असल्याने साहजिकच तुटवडा भासत आहे आणि परिणामी किमतीत वाढ झाल्याचे दिसून येते. अशातच काल, गुरुवारी केवळ 7,000 क्विंटल कांदा आल्याने दरात आणखीनच भर पडली आहे. परिणामी येत्या काही दिवसात किरकोळ बाजारात सुद्धा या वाढलेल्या किमतींचा प्रभाव पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, लासलगाव बाजारात कांद्याच्या भावात झालेली दरवाढ ही मागील काही दिवसात स्थिररूपात झाली आहे. तर दुसरीकडे कर्नाटक राज्यातील काही भागात अति पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने कांद्यासह अन्य उत्पादनांचे भाव देखील वाढल्याचे समजत आहेत. ही परिस्थिती पुर्वव्रत होण्यासाठी निदान 10 ते 15 दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे म्हंटले जात आहे मात्र तोपर्यंत कांद्याच्या वाढीव किमतीचा फटका नागरिकांना बसणार आहे हे निश्चित.