वडील आणि सावत्र आईने मुलांना अमानुषपणे मारहाण केल्याची घटना नाशिक (Nashik) येथून समोर येत आहे. या प्रकरणी मुलांच्या मामाने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर वडील आणि सावत्र आईला अटक करण्यात आली आहे. एबीपी माझाने दिलेल्या माहितीनुसार, विशेष म्हणजे मारहाण करणारे वडील स्वत: पोलिस कर्मचारी आहेत. दरम्यान, मुलांना चटके देऊन जबर मारहाण करण्यात आल्याने त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी राहुल मोरे हे स्वत: पोलिस कर्मचारी असून ते नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथे राहतात. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं, सध्या ते दुसरी पत्नी आणि पहिल्या पत्नीची दोन मुलं यांच्यासोबत राहतात. परंतु, दोन्ही मुलांचा प्रचंड छळ करण्यात येतो. चटणे देणे, मारहाण करणे हे प्रकार सर्रास घडतात.
याबद्दलची माहिती शेजारच्यांनी मुलांच्या मामाला दिली. त्यानंतर मुलांचा मामा सूरतहून आला. त्याने मुलांना रुग्णालयात दाखल केलं आणि राहुल मोरे व त्यांच्या दुसऱ्या पत्नी विरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल केली. त्यानंतर आरोपींवर कारवाई करण्यात आली. (धक्कादायक! 'तुम्हें सबकुछ आता है' असं म्हणत आठवीत शिकणा-या हुशार विद्यार्थ्याला 7 वर्गमित्रांनी केली बेदम मारहाण; अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल)
दरम्यान, या प्रकरणातील मुलगा 8 वर्षांचा असून मुलगी 5 वर्षांची आहे. या दोघांनीही इतकी जबर मारहाण करण्यात आली आहे की ती मुलं बोलूही शकत नाहीत. त्यामुळेच वडील आणि सावत्र आई यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नातेवाईक करत आहेत.