Bacchu Kadu | YouTube

प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. 2017 सालच्या प्रकरणातील ही शिक्षा आहे. बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या मागण्यांसाठी महापालिकेमध्ये आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांची तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याशी बाचाबाची झाली होती. बच्चू कडू तेव्हा आयुक्तांवर धावून गेले होते. याच प्रकरणी आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सध्या त्यांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीनही देण्यात आला आहे.

दरम्यान बच्चू कडू यांना नाशिकच्या जिल्हा न्यायालयात दमदाटी करणे आणि सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करणे अशा दोन प्रकरणांमध्ये एकत्र शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता बच्चू कडू या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार का? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणामध्ये नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 1, तर सरकारी अधिकाऱ्याला अपमानित केल्याप्रकरणी 1 अशी एकूण 2 वर्षांची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली आहे.

बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून (जि. अमरावती) सलग चौथ्यांदा निवडून आलेले अपक्ष आमदार आहेत. महाराष्ट्रातील सत्तांतरामध्ये त्यांनी शिवसेना-भाजपा बरोबर जात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना साथ दिली आहे.