Nashik Accident: चांदवडनजीक एसटी बसचा भीषण अपघात, पाचपेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू; अनेक गंभीररित्या जखमी
Death PC PIXABAY

Nashik Accident: मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवडलगत सकाळी एसटीचा भीषण अपघात (Bus Accident ) झाला. या अपघातात एसटी बस (ST Bus )मधील पाच ते सहा प्रवाशांचा मृत्यू (Passengers Died) झाल्याची माहिती मिळत आहे. तर, अनेक जण गंभीररित्या जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मालेगाव-चांदवड दरम्यान सकाळी पावणे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त बस जळगावहून वसईकडे निघाली होती. वसई आगाराची ही बस होती. जळगावहून ती वसईला निघाली होती. सकाळी पावणेदहाच्या मालेगावहून ती नाशिककडे जात असताना हा अपघात झाला.

एका वाहनाला ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एसटी महामंडळाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून जखमींना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात किती प्रवाशांचा मृत्यू झाला वा, किती जखमी झाले, याची स्पष्टता काही वेळात होईल, असे एसटी महामंडळाचे वाहतूक अधिकारी किरण भोसले यांनी सांगितले.अनेक प्रवासी गंभीररित्या जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे.