क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात (Cruise Drugs Party Case) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यात सुरुवातीपासूनच वाद रंगला आहे. यात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उडी घेतली आहे. बुलढाणा येथे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना त्यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. (Kirit Somaiya On Sharad Pawar: दाऊदसोबत विमानात कोण होते? हे शरद पवारांना विचारा, भाजप नेते किरीट सोमय्यांचे वक्तव्य)
राणे म्हणाले की, "समीर वानखेडे यांच्याबाबत नवाब मलिक यांनी रान उठवलं आहे. नवाब मलिक कोण आहे? त्यांचे जावई कोण आहे? त्यांनी आपली पार्श्वभूमीव पाहावी आणि मग दुसऱ्यांवर बोलावं.” केंद्र सरकार समीर वानखेडे यांच्या पाठीशी आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना राणे म्हणाले की, “मी आता जाईन आणि मोदी साहेबांना विचारेन की आपण पाठीमागे आहोत का?”
पहा व्हिडिओ:
चिखली, महाराष्ट्र येथील पत्रकार परिषदेतून लाईव्ह https://t.co/lTSYGYbALK
— Narayan Rane (@MeNarayanRane) October 31, 2021
तसंच चेंबूर येथील एक व्यक्ती फडणवीस यांच्या जवळचा असल्याच्या मलिक यांच्या आरोपाबाबत बोलताना ते म्हणाले की, "मग काय त्यात काय झालं? कोण कोणाचा मित्र आहे, तो माझाही मित्र आहे. तो आमचा कार्यकर्ता आहे. मी चेंबूरचा आहे, मुळात माझं लहानपण, आयुष्य चेंबूरमध्ये गेलं आणि तो काही दहशतवादी नाही. तो दोन नंबरच्या लोकांचीचांगली माहिती देतो. पैसे लपून ठेवतात ना त्या लोकांची."
हिवाळी अधिवेशनात खुलासा करण्याच्या मलिक यांच्या वक्तव्यावर राणे म्हणाले की, "अधिवेशन म्हणजे काय? कोणाचं अधिवेशन? भाजपाचे 105 आहेत आणि फासावर द्यायचा विधिमंडळाला अधिकार नाही. समीर वानखेडे यांनी काय केलं? जे चुकीचं करतात त्यांच्या मागे लागा. मीडियाने कोणाची बाजू घ्यावी? भ्रष्टाचार करणाऱ्यांची की भ्रष्टाचार उकरून काढणाऱ्यांची? एका-एका मंत्र्याकडून चौकशीमध्ये 24 हजार कोटी निघत आहेत. ते कुठून आणले? व्यवसायामधून? भ्रष्टाचार केला, लोकांचं शोषणचं केलं ना? मग लागू द्या मागे. तिथे आमचे देवेंद्र फडणवीस आहेत."
दरम्यान, यावेळी त्यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. "भुजबळांना अटक का झाली? पंढरपूरला तीर्थ यात्रेला गेले म्हणून झाली का? ते आता फार बोलताय.” असंही ते म्हणाले.