नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडलेल्या 24 तासांतील 24 मृत्यूंची शासनाने (Nanded Hospital Tragedy) मोठी दखल घेतली आहे. त्यातच आता महाविद्यालय आणि रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टरवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला आहे. रुग्णालयातील मृत्यूमुळे राज्यभर खळबळ उडाली होती. मृतांमध्ये लहान मुलांसह वृद्धांचाही समावेश होता. खास करुन या घटनेत 12 बालके दगावली होती. जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील करुळा येथील आई आणि मुलाच्या मृत्यू प्रकरणी हा गुन्हा दाखल झाल्याचे समजते.
आणखी एका प्रकरणात सांगितले जात आहे की, अंजली वाघमारे या 22 वर्षीय महिलेला नांदेड शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. तिचे प्रसुती अगदी नैसर्गिकरित्या झाली. मात्र, असे असतानाही तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेची प्रकृतीही बिघडत गेली. ज्यामध्ये तिचाही मृत्यू झाला.
अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टर विरोधात कामाजी टोम्पे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखलकेला आहे. टोम्पे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, रुग्णालयातील डॉक्टर आणि अधिष्ठातांनी आमच्या रुग्णाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. तसेच, रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरुन 45 हजार रुपयांची औषधे खरेदी करण्यास भाग पाडण्यात आले. इतके सगळे करुन उपचारही निट झाले नाहीत. परिणामी रुग्णालयाच्या चुकीमुळे रुग्ण दगावला.
टोम्पे यांनी तक्रारीत पुढे म्हटले आहे की, रात्री एकच्या सुमारास पत्नी अंजली यांची प्रसुती झाली. तिने मुलीला जन्म दिला. बाळ आणि बाळंतीण यांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, दुसऱ्या दिवशी अंजली हिच्या अंगातून रक्त जात असल्याचे सांगितले. तिची प्रकृती बिघडली असून शरीरात रक्त आणि पेशीची कमतरता आहे. त्यासाठी मेडीकलमधून बाहेरुन औषधे आणण्यास सांगितली आहे. आपण बाहेरुन औषधे आणून दिली. मात्र, त्याचा वापर करण्यासाठी डॉक्टरच हजर नव्हते. आपण डीनकडे (अधिष्ठाता) धाव घेतली. डॉक्टरांना पाचारण करण्यास सांगितले. मात्र, त्यांनी कोणतीही हालचाल केली नाही. उलट मलाच तिथे बसवून ठेवले. बराच वेळ कोणताही डॉक्टर अथवा नर्स तेथे आली नसल्याचे टोम्पे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
नांदेड येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूवरुन राजकीय वातावरणही जोरदार तापले आहे. विरोधकांनी आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, सरकारने एक समिती स्थापन करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. समितीचा अहवाल येताच दोषींवर कारवाई केली जाईल, असे सरकारने म्हटले आहे.