Hemant Patil | (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील शिवसेान खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा (Atrocity) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड येथील  शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. एस. आर. वाकोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. येथील वैद्यकीय महाविद्यालयात 24 तासात 24 जणांचा मृत्यू (Nanded Hospital Death Case) झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली होती. त्यामुळे घडल्या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी रुग्णालयात पोहोचलेल्या खासदार महोदयांनी स्वच्छतेच्या कारणावरुन नको तितका उत्साह दाखवत चक्क डीनलाच स्वच्छतागृह साफ करायला लावले. आता हे प्रकरण खासदारमहोदयांच्या चांगलेच अंगाशी आल्याचे पाहायला मिळत आहे.

डीन डॉ. एस. आर. वाकोडे यांनी स्वत: दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक जगदीश भांडारवाड यांनी दिली आहे. खासदार हेमंत पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रुग्णालय प्रशासनाला जाब विचारण्याच्या नादात त्यांनी चक्क डीनलाच स्वच्छतागृह साफ करायला सांगितले. ज्यामुळे खासदारांच्या कृतीविरोधात सेंट्रल मार्ड आक्रमक झाले आहे. घडल्या प्रकाराबद्दल संबंधित खासदाराने माफी मागावी अन्यथा डॉक्टर आंदोलन करतली, असा इशाराही मार्डने दिला आहे.

अधिष्ठाता (डीन) पदावरील व्यक्तीला अशा प्रकारे स्वच्छतागृह साफ करायला लावणे हे केवळ व्यक्ती म्हणून त्यांच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण डॉक्टरांसाठी अपमानास्पद आहे. यामुळे अधिष्ठाता आणि संपूर्ण डॉक्टरांचेच मानसिक खच्चीकरण झाले आहे. त्यामुळे हेमंत पाटील यांनी या प्रकरणात माफी मागावी. शिवाय त्यांनी माफी मागितली नाही तर राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडेल आणि त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असे मार्डने म्हटले आहे.