नांदेड: 17 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने उचलले टोकाचे पाऊल
Representational Image (Photo Credits: File Image)

नांदेड (Nanded) जिल्ह्यातील एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी (Online Education) मोबाईल (Mobile) मिळत नसल्याने अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं आहे. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, बिद्धशीला पोटफोडे असे या मृत विद्यार्थिनी नायगाव शहरातील फुलेनगर वसाहतीत राहत होती. ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने राहत्या घरात गळफास घेत तिने आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

बुद्धशीला हिला दहावीला 75 टक्के गुण मिळाले होते. बारावीतही चांगले गुण मिळवण्याचा तिचा मानस होता. सध्या अकारावीच्या अभ्यासासाठी ती आई-वडीलांकडे मोबाईलची मागणी करत होती. घराच्यांनीही तिला लवकरात लवकर मोबाईल घेऊन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र नैराश्यातून तिने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली. (Mobile Game Addiction: भंडारा मध्ये मोबाईल गेम खेळू न दिल्याने 16 वर्षीय तरूणीची आत्महत्या)

कोविड-19 संकटामुळे मागील वर्षीपासून ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली. वर्षभरापासूनच अनेक विद्यार्थी मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेटच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. ऑनलाईन पद्धतीने शाळा-कॉलेजच्या लेक्चर्संना उपस्थिती लावत आहेत. परीक्षा देत आहेत. मात्र घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना यापासून वंचित राहावे लागत आहे. या नैराश्यातून विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या काही घटना यापूर्वी देखील समोर आल्या आहेत. (नागपूरात पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्याने गळफास लावून केली आत्महत्या)

दरम्यान, लहानसहान कारणामुळे निराशेच्या गर्तेत जाण्याचे आणि त्यातून टोकाचे पाऊल उचलण्याचे प्रमाण तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सध्याच्या कोविड-19 च्या कठीण काळात धीर खचू न देता परिस्थितीला सामोरे जाणे अत्यंत गरजेचे आहे.