Nana Patole यांनी उल्लेख केलेला 'गावगुंड मोदी' आला समोर; पटोलेंच्या वक्त्यव्यावर दिला 'हा' खुलासा!
Nana Patole (Photo Credit: Twitter)

मागील काही दिवसांपासून कॉंग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी 'मोदी' वरून केलेल्या काही आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे ते चर्चेमध्ये आहेत. दरम्यान काल (21 जानेवारी) नाना पटोलेंनी उल्लेख केलेला 'गावगुंड' नागपुरामध्ये सार्‍यांसमोर आला आणि पत्रकार परिषदेमध्ये आपली बाजू मांडली आहे. यावेळी बोलताना त्याने 'नाना पटोलेंनी ज्या 'मोदी' बद्दल भाष्य केले तो मीच आहे.' आपले टोपण नाव मोदी असल्याचे त्याने कबूल केले आहे. दरम्यान या व्यक्तीचं मूळ नाव उमेश प्रेमदास घरडे आहे.

नाना पटोले यांनी 'मोदी' वरून केलेलं वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून नव्हे तर नागपूरातील गावगुंड याच्याबद्दल असल्याचे म्हणत खुलासा दिला होता. उमेश घरडे सोबत पत्रकार परिषदेमध्ये वकील सतिश उके देखील हजर होते. हे देखील नक्की वाचा: Nana Patole यांचं आक्षेपार्ह विधानाच्या वायरल व्हीडिओवर स्पष्टीकरण, म्हणाले,' मी गावगुंडाबाबत बोलत होतो' .

उमेश घरडे यांनी टीव्ही 9 शी बोलताना दिलेल्या माहितीमध्ये,'आपण दारूच्या नशेत काहीही बरळतो. असंच दारू पिऊन मद्यधुंद असताना नाना पटोले यांच्यासह एकाला शिवीगाळ केली होती. या प्रकारासाठी मला माफीदेखील मागयची होती पण मी पटोलेंपर्यंत पोहचू शकलो नाही.' असं त्याने म्हटलं आहे.

उमेश घरडे यांना 'मोदी' या टोपणनावाने का संबोधलं जातं? याचा देखील खुलासा केला आहे. वकील सतिश उके यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश यांची पत्नी त्यांना सोडून गेल्याने त्याला मोदी म्हणतात, मागील 4 वर्षांपासून गावातील लहान मोठी मंडळी मोदी म्हणतात. त्यांच्या स्वतःच्या नावाने त्यांना कुणीच हाक मारत नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.