नायर हॉस्पिटल मध्ये तीन डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण
Representational Image | (Photo Credits: Unsplash.com)

डॉक्टरांवर होणारे हल्ले हा मागील काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे, याच पार्श्वभूमीवर देशभरातील डॉक्टरांनी अलीकडे संप देखील केला होता त्यावेळी केंद्र सरकार तर्फे त्यांना जीवाच्या सुरक्षेची हमी देण्यात आली होती, मात्र हे आश्वासन देऊन काही दिवस न उलटताच भायखळा (Byculla)  येथील नायर रुग्णालयात (Nair Hospital)  डॉक्टरांवरील हल्ल्याची नवी घटना समोर येत आहे. नायर मध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या दहा ते बारा जणांच्या जमावाने रविवारी तीन डॉक्टरांना मारहाण केली. त्यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या सुरक्षा रक्षकांनाही त्यांनी चोप दिला, इतकंच नव्हे तर रुग्णालयातील सामानाची सुद्धा तोडफोड केली.

(हे ही वाचा -अखेर ममता बॅनर्जी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांसमोर झुकल्या; केल्या सर्व मागण्या मान्य, हजारो रुग्ण करत होते प्रतीक्षा)

यासंदर्भात आग्रीपाडा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय रुग्णाला न्यूमोनिया, क्षयरोग, व HIV चा आजार होता. रविवारी सकाळी या रुग्णाला नायर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते मात्र अगोदरच अवस्था खराब असल्याने संध्याकाळी 6.30 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. रुग्णाच्या मृत्यूने संतप्त कुटुंबीयांनी डॉ. दिपाली पाटील, डॉ. गौरव गुंजन आणि डॉ. मोईझ वोरा या तिघांवर शाब्दिक व शारीरिक हल्ला केला, तसेच या जमावाने वार्ड मध्ये घुसून इतर रुग्णांना तर या प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला देखील मारहाण केली. दरम्यान, सहकारी डॉक्टरांनी धाव घेत जमावाच्या तावडीत सापडलेल्या डॉक्टरांसह इतर रुग्णांनाही वाचवले. याबाबत महाराष्ट्र रहिवाशी डॉक्टर संघटनेने (MARD) पोलिसांकडे तक्रार केली आहे.

दरम्यान, मृत रुग्णाच्या कुटुंबांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे, तर मार्डने आपली भूमिका ठाम मांडत याप्रकरणात सरकारला लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी एक कायदा बनवण्याची मागणीही करण्यात आली आहे.