मुंबईतील नायर रुग्णालयात जातीवरुन होत असलेल्या छळाला कंटाळून एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेने आत्महत्या केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नायर रुग्णालयाने रॅंगिंग विरोधी समितीची बैठक बोलावली. तसंच या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर प्रसुती विभागातील डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल तिन्ही डॉक्टर फरार असल्याचे निर्दशनास आले.
हे तीन डॉक्टर्सवर रॅंगिंगचा आरोप असून ते फरार असल्याने त्यांची बाजू अद्याप कळू शकलेली नाही. रॅगिंग विरोधी समितीच्या बैठकीत विद्यार्थी डॉक्टर, वैद्यकीय तज्ज्ञ, कर्मचारी, परिचारिका तसेच विभागप्रमुखांसह समितीमधील विद्यार्थी डॉक्टर प्रतिनिधींचा समावेश होता. तसंच नायर रुग्णालयाकडून डॉक्टरांसाठी हेल्पलाइन क्रमांक, समुपदेशन कक्ष सुरु करण्याचा विचार सुरु आहे. (मुंबई: नायर इस्पितळात त्रासाला कंटाळून रहिवाशी महिला डॉक्टरची आत्महत्या, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल)
26 वर्षीय पदव्यूत्तर शिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर पायल तडवी हिने बुधवारी जातीवरुन होणाऱ्या त्रासाला कंटाळून हॉस्टेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर आग्रीपाडा पोलिसांच्या तपासात डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल या तीन महिला डॉक्टर व्हाटसअॅप चॅटवरून पायलचे रॅगिंग करत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी या तीन महिला डॉक्टरांवर आयपीसी कलम 306 (आत्महत्येला भाग पाडणे), रॅगिंग विरोधी व माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्यांच्यावर ऍट्रॉसिटी देखील दाखल करण्यात आली आहे.