Nagpur Zilla Parishad Election Results 2021: नागपूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसची एकहाती सत्ता कायम; भाजप, राष्ट्रवादीला फटका
Congress | (File Image)

नागपूर जिल्हा परिषद (Nagpur Zilla Parishad) आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेसने (Congress) दमदार यश मिळवले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला काहीसा झटका बसला आहे. या विजयाच्या रुपात काँग्रेसने नागपूर जिल्हा परिषदेवरची (Nagpur Zilla Parishad Election Results 2021) आपली सत्ता कायम ठेवली आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या 2 जागा वाढल्या आहेत. काँग्रेस नेते यांनी प्रचाराची धुरा आपल्याकडे घेत या निवडणुकीत प्रचाराचा धुरळा उडवला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे प्रचारात सहभागी न झाल्याने राष्ट्रवादीला जोरदार फटका बसला.

जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते अनिल निधान यांचा पराभव झाला आहे. तर भाजपचे इतर दोन उमेदवार विजयी झाले. गोंडवाना गणतंत्र पार्टी एका जागेवर विजयी झाली. नागपूर जिल्हा परिषदेत एकूण 58 जागा आहेत. त्यापैकी 16 जणांचे सदस्यत्व रद्द झाले होते. (हेही वाचा, Maharashtra ZP and Panchayat Samiti Election Results 2021: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकाल, ठळक घडामोडी)

नागपूर जिल्हा परिषद निकाल (पक्षनिहाय जागा)

काँग्रेस - 7

राष्ट्रवादी - 4

भाजप - 4

शेकाप -1

जिल्हा परिषद सदस्यांचे सदस्यत्व रद्द होण्यापूर्वीची पक्षीय बलाबल

काँग्रेस -- 31

राष्ट्रवादी - 10

भाजप - 15

शेकाप - 1

सेना - 1

दरम्यान, राज्यात महाविकासआघाडी सरकार सत्तेत आहे. त्यामुळे हीच आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही पाहायला मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, राज्यात महाविकासआघाडी असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मात्र वेगळे लढण्याचा निर्णय आघाडीतील घटकपक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. त्यामुळे काही ठिकाणी आघाडी तर काही ठिकाणी स्वबळावर सामना पाहायला मिळत आहे. राज्यातील या हटके अशा समिकरणाला जनता कशी दाद देते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.