
नागपूर (Nagpur ) येथील कामठी परिसरातील एका तरुण व्यवसायिकाने आत्महत्या (Suicide) केली आहे. आयुष अजय त्रिवेदी (२६, ऑरेंज सीटी, राजा रॉयलजवळ, नवीन कामठी) असे या तरुणाचे नाव आहे. आयपीएल सामना रात्री उशीरपर्यंत पाहिल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. धक्कादायक म्हणजे आयपीएल सामन्याचा थरार अनुभवल्यानंतर या तरुणाने पिस्तुलाने स्वत:च्याच डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे स्पष्ट कारण अद्याप पुढे आले नाही. मात्र, कर्ज आणि व्यावसायिक ताण-तणावातून त्याने हे कृत्य केले असावे, असा कयास आहे.
अजय त्रिवेदी याचे सावनेर-कामठी परीसरात बांधकामाचे साहित्य पुरवण्याचा व्यवसाय आहे. याशिवाय हा तरुण रेती व्यवसायातही सक्रीय होता. त्यामुळे त्याच्याकडे पोकलँड, ट्रक अशीही काही वाहने होती. दरम्यान, पाठिमागच्या काही दिवसांपासून तो कर्जबाजारीमुळे आर्थिक तणावात होता. त्या तणावातूनच त्याने हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज आहे. (हेही वाचा, Pune Shocker! गर्लफ्रेंड चिडली बॉयफ्रेंडशी भिडली, सुरीचा वार, 'तो' आयुष्यातून हद्दपार; तिच्या कृत्याने पुणे हादरलं)
राहत्या घरात आयुष हा वरच्या मजल्यावर तर त्याचे आई-वडील आणि बहिण खालच्या माळ्यावर राहात असत. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशीरपर्यंत तो ता आयपीएलचा सामना पाहात होता. मंगळवारी सकाळी बराच वेळ होऊन गेला तरी तो उठला नाही. रात्री उशीरपर्यंत जागा राहील्याने झोपला असेल असे वाटल्याने सुरुवातीला कुटुंबीयांनी लक्ष दिले नाही. मात्र, बराच वेळ झाला तरी कोणतीही हालचाल दिसली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला आवाज दिला. मात्र, त्याने दरवाजा उघडला नाही. कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला परंतू दरवाजाला आतून कडी होती. त्यामुळे तो उघडला गेला नाही. त्यानंतर त्याच्या आईने खिडकीतून आत डोकावले असता तो बोडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.
मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. कुटुंबीयांचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले. समोरील दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी फॉरेन्सीक पथक बोलावून खोलीची तपासणी केली. पोलिसांना मोबाईल, पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनास पाठवून दिले. तसेच मोबाईल, पिस्तूल जप्त केले.