
नागपूर (Nagpur) येथील एका व्यक्तीवर 1979 मध्ये प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल होता. त्यानंतर या गुन्ह्यात तो फरार झाल्यानंतर आता तब्बल त्रेचाळीस वर्षांनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सध्या या व्यक्तीचे वय 75 वर्षे आहे. सरकारी लाभार्थ्यांच्या यादीत त्याचे नाव दिसून आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे, असे एका अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. दीपक बनसोड असे या आरोपीचे नाव आहे. 1979 मध्ये, बनसोड विरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 325 नुसार येथील सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
21 एप्रिल 1979 रोजी बनसोडने आनंद टॉकीजजवळ कॅरम खेळताना झालेल्या वादातून एका व्यक्तीचे नाक फ्रॅक्चर केले होते. पोलिसांच्या नोंदीनुसार बनसोड तेव्हा 32 वर्षांचा होता. त्याच्या आधार कार्डावर त्याचे जन्मवर्ष 1947 आहे. त्यावेळी त्याला या प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि स्थानिक न्यायालयातही हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यावेळी जामीन मंजूर केला होता.
परंतु जामिनावर सुटका झाल्यानंतर लगेचच बनसोड सीताबर्डी परिसरात भाड्याने घेतलेले निवासस्थान सोडून फरार झाला. पोलिसांनी त्याचा खूप शोध घेतला परंतु तो सापडला नाही. त्याच्या विरुद्ध अनेक समन्स व वॉरंट बजावण्यात आले असतानाही तो कधीही सुनावणीसाठी आला नाही. अशाप्रकारे बनसोड चार दशकांहून अधिक काळ त्याचा खटला चुकवत होता आणि त्याला 2019 मध्ये ‘घोषित फरारी’ म्हणून घोषित करण्यात आले. (हेही वाचा: Crime: प्रशिक्षिणादरम्यान दोन अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका क्रीडा प्रशिक्षकाला अटक)
मात्र नुकतेच त्याचे नाव सरकारी योजनांमध्ये लाभार्थी म्हणून समोर आल्यानंतर अखेर पोलिसांनी त्याचा शोध लावला. गुन्हे शाखेने त्याला पकडून पुढील कारवाईसाठी सीताबर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले. सीताबर्डी पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक अतुल सबनीस यांनी सांगितले की, बनसोडचे वय खूपच जास्त असून त्याला पोलिस ठाण्यात ताब्यात घेतले जाऊ शकत नाही. त्याला सोमवारी पुन्हा हजर होण्याची नोटीस दिली. त्याचे काय करायचे ते आता न्यायालय ठरवेल.