Nagpur: अशक्य ते शक्य करतील गावकरी! बोअरवेलमध्ये पडलेल्या बाळाला जीवदान, नागपूर जिल्ह्यातील शिवनी भोंडकी येथील घटना
Borewell | (File Photo)

नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील रामटेक (Ramtek Taluka) तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. शिवनी भोंडकी (Shioni Bhondki) गावात दोन वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. नवघान देवा दोंडा असे या मुलाचे नाव. शिवारात खेळता खेळता तो बोअरवेलमध्ये पडला. त्याच्या आईवडीलांच्या पायाखालची जमीनच घसरली. त्यांनी आरडाओरडा केला. अख्ख गाव शिवारात जमलं. आईवडीलांनी हिंमत हारली. त्यांना वाटले आता आपला देवघान परत मिळणार नाही. पण, गावकरी जिद्दी होते. त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी प्रशासनाला कल्पना दिली आणि कामाला लागले. ते प्रयत्न करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. देवघान सुखरुप बोअरवेलबाहेर आला. गावकऱ्यांच्या प्रयत्नांनी देवघान बाहेर आलेला पाहून घटनास्थळी पोहोचलेलेले प्रशासनही आनंदी झाले.

घटनेबाबत प्राप्त माहिती अशी की, नवघान आपल्या गुरे चारणाऱ्या वडिलांसोबत शिवरात फिरत होता. त्याच्यासोबत इतरही काही मुलं शिवारात खेळत होती. खेळता खेळता ही सर्व मुले बोअरवेलजवळ पोहोचली. देवघानही सोबत होता. दरम्यान, देवघान बोअरवेलच्या खड्ड्यात पडला. ते पाहून घाबरलेली मुले मोठमोठ्याने रडू लागली. गोंधळ करु लागली. त्यांचा आवाज कानी पडताच देवघानचे आई-वडील तेथे आले. त्यांनी मुलगा बोअरवेलमध्ये पडलेला पाहून हांबरडा फोडला. एकाच वेळी निर्माण झालेला गोंधळपाहून गावकरीही घटनास्थळी पोहोचले. (हेही वाचा, पुणे: 200 फूट खोल बोअरवेलमध्ये 10 फुटांवर अडकला 6 वर्षांचा मुलगा)

सगळे गावकरी पोहोचेपर्यंत अर्ध्या तासाहून अधिक वेळ हे बाळ बोअरवेलच्या खड्ड्यातच पडून होते. मग गावकऱ्यांनी टॉर्च आणि दोरीच्या सहाय्याने देवघानला बोअरवेलच्या खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. जवळपास पन्नास फुटांपेक्षा अधिक खोल असलेल्या बाळाला गावकऱ्यांनी रस्सीला पकडण्यास सांगितले. त्यानेही ही दोरी पकडली तो बाहेर आला. जणू त्याला जीवनाचीच दोरी सापडली. या शिवारातील बोअरवेलला पाणी न लागल्याने एका शेतकऱ्याने हा खड्डा तसाच उघडा ठेवला होता. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात असलेले हे गावा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांच्या सीमेवर आहे.