कोरोना विषाणूनंतर (Coronavirus) देशामध्ये काळ्या बुरशीने (Black Fungus) डोके वर काढले आहे. या संसर्गाचा परिणाम रुग्णाच्या डोळ्यासह इतर अवयवांवर होतो. अनेक ठिकाणी या आजारामुळे रुग्णाने डोळे गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. आता नागपूर (Nagpur) येथे काळ्या बुरशीच्या संसर्गामुळे दोन्ही डोळे गमावलेला 46 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. शहरातील माणकापुरा भागात निवासस्थानी दुपारी तीनच्या सुमारास हेड कॉन्स्टेबल प्रमोद मेरगुवार यांनी आपल्या पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडली.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रमोद हे काही वर्षांपूर्वी प्रतिनियुक्तीवर स्पेशल सिक्युरिटी युनिट (SPU) मध्ये दाखल झाले होते. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणू झाला होता. या आजारातून ते बरेही झाले होते मात्र दुर्दैवाने त्यानंतर त्यांना म्युकरमायकोसिस झाला. त्यानंतर प्रमोद यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यादरम्यान डॉक्टरांना त्यांना एक डोळा काढावा लागला. त्यानंतर त्यांना दुसऱ्या डोळ्यानेही कमी दिसून लागले. पुढे ते उपचारासाठी हैद्राबाद येथे दाखल झाले. जेव्हा संसर्ग झपाट्याने पसरू लागला तेव्हा त्यांचा दुसरा डोळाही काढला गेला.
मात्र या आजारामधून सावरल्यानंतर प्रमोद नैराश्यग्रस्त झाले होते. घरी परत आल्यावर एके दिवशी आपल्या खोलीत कोणी नाही याची खात्री झाल्यावर त्यांनी स्वतःवर गोळी झाडली. त्यावेळी त्यांच्या बंदुकीमध्ये 6 गोळ्या होत्या. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे आणि अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा: Jalgaon Suicide: लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद पडल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या 35 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या)
प्रमोद हे एका दोन मजली इमारतीमध्ये राहत होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या भावाचे निधन झाले होते. घराच्या वरच्या मजल्यावर त्यांची वाहिनी आपल्या 2 मुलांसह राहत होती. खालच्या मजल्यावर प्रमोद आपली पत्नी व दोन मुलांसह राहत होते. भावाच्या निधनानंतर कुटुंबाला प्रमोद यांचा फार मोठा आधार होता. त्यांना 18 व 14 वर्षांची दोन मुले आहेत.