नागपूर: अंघोळ करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ काढून अश्लील चाळे, शरीरसुखाचीही मागणी; नोकराविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल
Mobile video | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

नागपूर (Nagpur) येथील अजनी परिसरात एका इसमाविरुद्ध विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल झाला आहे. चेतन खडतकर असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव असल्याचे समजते. एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) खडतकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चेतन याने आपण अंघोळ करत असतानाचा व्हिडिओ काढला. तसेच, आपल्याला धमकी देत ब्लॅकमेल केले. आपल्याशी अश्लिल चाळे करत शरीरसुख मागीतले, असा आरोप तक्रारदार महिलेने तक्रारीत केला आहे.

तक्रारदार महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा पती व्यवसायाने सीए आहे. चेतन खडतकर हा त्यांच्याकडे नोकर म्हणून कामाला आहे. महिलेच्या पतीचे म्हणजेच सीएचे कार्यालय त्याच्या राहत्या घरीच आहे. त्यामुळे सीएच्या घरी चेतन याचे नियमीत जाणे-येणे होते. सीएच्या घरातील सर्व सदस्यही चेतन यास परिचित होते. दरम्यान, चेतन याने तक्रारदार महिलेवर एकतर्फी प्रेम करण्यास सुरुवात केली. तक्रारदार महिलेला चेतन याचे वर्तन संशयास्पद वाटत होते. मात्र, नोकर असल्याने आणि घरात नियमीत येणेजाणे असल्याने तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. (हेही वाचा, धक्कादायक! पुणे येथील हडपसर परिसरातील सह्याद्री रुग्णालयात वॉर्डबॉयकडून एका कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग)

तक्रारदार महिलेने तक्रारीत पुढे म्हटले आहे की, चेतन खडतकर याने 6 जुलै या दिवशी आपण बाथरुममध्ये अंघोळीला गेलो असता आपला मोबाइलद्वारे व्हिडिओ काढला. पुढे त्याने घरातील संगणकावर एक धमकीचे पत्र तयार करुन ते पीडितेला पाठवून दिले. त्यानंतर त्याने महिलेला ब्लॅकमेल केले. तसेच, तिच्याशी अश्लील चाळे केले. तक्रारदार महिलेने सुरुवातीला त्याकडेही दुर्लक्ष केले. मात्र, पुढे जाऊन त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.

नोकराचे वर्तन महिलेने पतीला सांगितले. त्यानंतर तक्रारदार महिला आणि तिच्या पतीने पोलिसांत येऊन चेतन खडतकर या इसमाविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.