संपूर्ण महाराष्ट्र कोरोना संकटाशी लढत असताना पुण्यातून एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. पुणे (Pune) येथील हडपसर (Hadapsar) परिसरात सह्याद्री रुग्णालयातील (Sahyadri Hospital) वार्डबॉयकडून एका कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याने हा प्रकार पाहिला आणि आरोपीला हटकले. तसेच घडलेला सर्व प्रकार रुग्णालयातील प्रशासनाला त्वरित कळवल्यानंतर स्थानिक पोलिसांत याबाबत तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर पीडित महिलेचा जाब नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली. तसेच आरोपीची कोरोना तपासणीदेखील करण्यात आली असून हडपसर पोलिसांकडून पुढील चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक नामदेव गवळी असे अटक करण्यात आरोपीचे नाव आहे.तआरोपी हा हडपसर भागातील सह्याद्री रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करित आहे. तसेच पीडित महिला ही गेल्या काही दिवसांपासून या रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहेत. मात्र, शुक्रवारी सायंकाळी ही महिला आपल्या खोलीमध्ये आराम करीत असताना आरोपी त्या ठिकाणी आला. त्यानंतर त्याने पीडित महिलेच्या चेहऱ्यावरील मास्क काढून तुम्ही मला ओळखता का? असे विचारत विनयभंग तिचा विनयभंग केला. मात्र, त्याचवेळी रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याने हा प्रकार पाहून रुग्णालयातील प्रशासनाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास रूग्णालयामधील कर्मचारी आले. त्यानंतर घटनास्थळी पीडित महिलेच्या खोलीची महिला पोलीस कर्मचार्यांनी पीपीई किट घालून पाहणी केली, अशी माहिती लोकसत्ताने दिली आहे. हे देखील वाचा- रुग्णालयातून पळालेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह डोंबिवलीतील खाडीत सापडला
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत मोठी वाढ होत असून यावर उपचारांसाठी रुग्णालय किंवा कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या महिलांच्या विनयभंगच्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. याआधी पुण्यात सिंहगड रोडवरील कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती. यामुळे रुग्णालयातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.