रुग्णालयातून पळालेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह डोंबिवलीतील खाडीत सापडला
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच कोरोनाच्या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून सुद्धा काळजी घेतली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला रुग्णांवर डॉक्टर्स, वैद्यकिय  कर्मचारी आणि नर्स यांच्याकडून अहोरात्र उपचार करण्यात येत आहेत. याच दरम्यान आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे एका 53 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने उपचार करण्यात येणाऱ्या रुग्णालयातून चक्क पळ काढला. परंतु त्यानंतर या रुग्णाचा मृतदेह डोंबिवलीतील खाडीत मिळाल्याची बाब समोर आली आहे.

सदर व्यक्तीला गेल्याच आठवड्यात प्रकृती सुधारल्याने डिस्चार्ज देण्यात आला होता. विष्णु नगर येथील वरिष्ठ पोलीस राजेंद्र मुणगेकर यांनी या प्रकरणी असे म्हटले आहे की, रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर पुन्हा त्याला त्रास जाणवू लागल्याने बुधवारी उपचारासाठी नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. परंतु व्यक्तीने उपचार घेण्याऐवजी तेथून पळ काढला.मुणगेकर यांनी पुढे असे म्हटले आहे की, प्राथमिक तपासात असे दिसून आले की रुग्ण नाखूश होता. यावर आता भाजप नेते किरिट सौमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरले असून त्याच्या परिवाराची भेट घेणार आहे. तसेच या प्रकरणी अधिक तपास केला जावा अशी सुद्धा मागणी सौमय्या यांनी केला आहे.(Coronavirus Lockdown in Thane: ठाणे जिल्ह्यामध्ये कंटेन्मेंट झोन साठी लॉकडाऊन 31 ऑगस्ट पर्यंत कायम!)

दरम्यान, डोंबिवलीतील कोरोनाच्या परिस्थिती बाबत बोलायचे झाल्यास गुरुवारी आलेल्या आकडेवारी नुसार, कल्याण-डोंबिवली परिसरात एकूण 329 रुग्णांची नोंद झाली असून 11 जणांचा बळी गेला आहे. त्यामधील 87 रुग्ण हे कल्याण ईस्ट, 68 कल्याण पश्चिम, 79 डोंबिवली ईस्ट आणि 51 डोंबिवली पश्चिमेकडील आहेत. 24 रुग्ण हे मांडा टीटवाळा आणि 20 हे मोहना येथील आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत एकूण कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 22,286 वर पोहचला असून 425 जणांच बळी गेला आहे.