नागपूर: क्षुल्लक कारणावरुन वारंवार शिवीगाळ करणाऱ्या ढाबा मालकाची हत्या; नोकरास अटक
Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

क्षुल्लक कारणावरुन वारंवार शिवीगाळ करणाऱ्या ढाबा मालकाची नोकराने हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ही घटना नागपूर (Nagpur) येथील हिंगणातील (Hingana) रिंगरोड (Ring Road) परिसरात शुक्रवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी नोकराला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ढाबा मालक आणि आरोपी यांच्यात शुल्लक कारणांवरून वाद झाला होता. या वादातून आरोपीने ढाबा मालकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करीत त्याची हत्या केली. या घटनेने संपूर्ण नागपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्रवीण सातपुते (वय 42) असे हत्या झालेल्या मालकाचे नाव आहे. प्रवीण यांचा मोहगाव झिल्पी मार्गावर रिंगरोडच्या कडेला ‘तंदुरी ढाबा अँण्ड रेस्टॉरंट’या नावाचा ढाबा होता. तसेच आरोपी निखिल धाबर्डे (वय 29) प्रवीण यांच्या ढाब्यावर नोकर म्हणून काम करित होता. या ढाब्यावर जास्त ग्राहक नसायचे यामुले प्रवीण स्वतः स्वयंपाकाचे काम करत होता. तर, निखिल त्या ठिकाणी ग्राहकाला जेवण वाढण्याचे काम करायचा. मात्र, प्रवीण हा नेहमी क्षुल्लक कारणांवरून निखिलला शिवीगाळ करायचे. दररोज शिवीगाळ करण्याच्या प्रवीणच्या सवयीला निखील वैतागला होता. ढाबा बंद झाल्यानंतर प्रवीण रात्री ढाब्याच्या ठिकाणीच मद्य प्राशन करुन झोपायचा. आरोपीही रात्री तिथेच थांबायचा. शुक्रवारी मध्यरात्री पुन्हा प्रवीणने निखिलला शिवीगाळ केली. याचा राग मनात धरत प्रवीण खुर्चीवर बसलेला असताना आरोपीने पाठीमागून लोखंडी रॉडने वार करत तेथून पळ काढला. सकाळी एका शेतकऱ्याने ढाबा मालकाला रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडल्याचे पाहिले. त्यानंतर त्याने तातडीने स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. हे देखील वाचा- पुणे: एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका विवाहित महिलेचा चाकू भोसकून खून; आरोपीचाही आत्महत्येचा प्रयत्न

या घटनेची माहिती होताच हिंगाणा पोलीसांनी घटनास्थळी पोहचून चौकशीला सुरुवात केली. तसेच नोकरानेच मालकाच्या हत्या केल्याची त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी नोकराचा शोध घ्यायला सुरुवात केली. अवघ्या काही तासातच नोकराला अटक करण्यात हिंगाणा पोलिसांना यश आले आहे.