महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारने 11 डिसेंबरच्या कॅबिनेट बैठकीत मुंबई नागपूर महामार्गाला (Nagpur-Mumbai Expressway) बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता या महामार्गाचे नाव 'हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' (Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg) असं करण्यात आलं आहे. मागील अनेक वर्षांपासून या महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यावं अशी शिवसैनिकांची आग्रहाची मागणी होती. समृद्धी द्रुतगती महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय.
मुंबई आणि नागपूर शहराला जोडणारा हा महामार्ग 701 किमी लांबीचा आहे. आठ मार्गिका असणारा हा एक्सप्रेस वे सुमारे 10 जिल्ह्यांमधून आणि 390 गावांमधून जाणार आहे. या महामार्गासाठी 46,000 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर मुंबई आणि नागपूर या शहरांमधील अंतर 8 तासामध्ये कापणं शक्य होणार आहे.
भारत देशातील पहिल्या मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गाची मुहूर्तमेढ बाळासाहेब ठाकरेंनी रोवली होती. त्यांच्या योगदानाचा आणि दूरदृष्टीचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्याची मागणी अशी शिवसेनेने मागणी होती. दरम्यान मागील सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये समृद्धी महामार्गाला अटलबिहारी वाजपेयी याचं नाव देण्याचा घाट घातला होता. त्यावरून तत्कालीन सत्तेमध्ये असणार्या शिवसेना आणि भाजपामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती.