Sandip Joshi | Photo Credits: Twitter/ ANI

नागपूरचे महापौर संदीप जोशी (Nagpur Mayor Sandip Joshi) यांच्यावर काल (17 डिसेंबर) च्या मध्यरात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. अमरावती आऊटर रिंग रोड परिसरात संदीप जोशी यांच्या गाडीवर 4 गोळ्या झाडण्यात आल्या. सुदैवाने या घटनेत संदीप जोशी यांना कोणतीच ईजा झालेली नाही. मात्र त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. रात्री उशीरा एका खाजगी कार्यक्रमातून परतताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे.सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना हा प्रकार घडल्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वर्धा मार्गावर असलेल्या जामठा येथील राष्ट्रीय कर्करोग संस्थेजवळील रसरंजन धाब्यावर एक खाजगी कार्यक्रम आटोपल्यानंतर संदीप जोशी पुन्हा घरी परतत होते. त्यावेळेस त्यांच्या ताफ्यातील सार्‍या गाड्या पुढे गेल्या नंतर त्यांच्या गाडीवर अचानक बेछुट गोळीबार करण्यात आला. यामध्ये गोळ्या काचेच्या खिडक्यांना भेदून आत घुसल्या मात्र सुदैवाने संदीप जोशी बचावले. यावेळेस संदीप जोशी स्वतः गाडी चालवत होते.

ANI Tweet  

मीडीया रिपोर्ट नुसार, काही दिवसांपूर्वी संदीप जोशी यांना धमकण्यात आले होते. नागपूरात अतिक्रमण हटवण्याचा विरोधात त्यांनी कारवाई सुरू केली आहे. सोबत नागपूरात तक्रारी जाणून घेण्यासाठी बॉक्स लावण्यात आले आहेत. अशा एका बॉक्समध्ये संदीप जोशींसाठी धमकीचे पत्र आले होते. त्यामध्ये त्यांच्यासह कुटुंबीयांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सध्या याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.