Nagpur Deekshabhoomi Renovation Project: नागपुरात भूमिगत पार्किंगला विरोध; दीक्षाभूमी नूतनीकरण प्रकल्पाच्या कामाला स्थगिती, Devendra Fadnavis यांची माहिती
Devendra Fadnavis | (Photo Credit - X)

Nagpur Deekshabhoomi Renovation Project: राज्य शासनाने नागपुर (Nagpur) येथे 200 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ केला. होता. त्याद्वारे दीक्षाभूमीच्या Deekshabhoomi 22.80 एकर परिसराचा विकास करण्यात येणार होता. नागपुरच्या पवित्र दीक्षाभूमी येथे भूमिगत पार्किंग तयार करण्याचा प्रस्ताव होता, ज्याला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. बौद्ध धर्माचे हजारो अनुयायी सोमवारी अचानक मैदानावर पोहोचले आणि त्यांनी मोठे आंदोलन केले. आंदोलनात सहभागी लोकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोडही केली. या पार्किंगला होत असलेला विरोध पाहता, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले की, नागपुरातील दीक्षाभूमी स्मारकाच्या भूमिगत पार्किंग प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली आहे.

भूमिगत पार्किंगच्या सुरू असलेल्या बांधकामामुळे दीक्षाभूमी स्मारकाचे नुकसान होऊ शकते, असा दावा आंदोलकांनी केला. स्थानिक लोकांच्या भावना लक्षात घेऊन विकास प्रकल्पांतर्गत भूमिगत पार्किंगचे काम थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात सर्व संबंधितांची बैठक बोलावून सर्वानुमते निर्णय घेतला जाईल.

दीक्षाभूमी मेमोरियल ट्रस्टशी सल्लामसलत करून तयार करण्यात आलेल्या दीक्षाभूमी विकास प्रकल्पासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी येथे त्यांच्या हजारो अनुयायांसह, प्रामुख्याने दलितांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यामुळे हा परिसर बौद्ध धर्मियांसाठी अतिशय पवित्र आहे. आता या ठिकाणी भूमिगत वाहनतळ होत असल्याने, बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेकडो अनुयायांनी या विरोधात निदर्शने करून पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा: Pune Police Issued Notice To Sambhaji Bhide: संभाजी भिडे यांना पुणे पोलिसांकडून नोटीस जारी; कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन)

या भूमिगत पार्किंगला विरोधी पक्षाचे नेते सातत्याने विरोध करत असून, त्यात प्रकाश आंबेडकर आघाडीवर आहेत. भूमिगत पार्किंग तातडीने बंद करण्यात येत असल्याचे लेखी आश्वासन दीक्षाभूमी समितीने दिले आहे. दीक्षाभूमी ट्रस्टचे सचिव राजेंद्र गवई यांनी याबाबत माहिती दिली आहे. नागपुरातील दीक्षाभूमी मैदानावर सुरू असलेले बांधकाम बंद करण्यात आले आहे. फडणवीस म्हणाले की, दीक्षाभूमी हे संपूर्ण देशासाठीचे स्मारक आहे. तेथील विकासकामे करण्यासाठी दीक्षाभूमी स्मारक समितीने विकास आराखडा अंतिम केला आहे. त्यानुसार तेथे कामे सुरू आहेत. मात्र, अशा विकास कामांमध्ये मतमतांतरे असणे योग्य नाही. त्यामुळे याप्रकरणी आंदोलन करणारे आंदोलक आणि स्मारक समिती यांची एकत्रित बैठक घेतली जाईल. तोपर्यंत भूमिगत वाहनतळ कामाला स्थगिती देत आहे. याबाबत, एकत्रित बैठकीनंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.