कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. यातच नागपूर येथे कोरोनाग्रस्त मृताच्या संपर्कात आल्यामुळे 37 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे नागपूर शहरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. या वाढलेल्या आकड्यांमुळे कोविड-19 ची भयावहता अधोरेखित होत आहे. नागपूर (Nagpur) येथे एकाच वेळी 37 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. तसेच मृताच्या संपर्कात आलेल्यांचा अनेक लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Munde) यांनी त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली माहिती पालिकेला कळवण्याचे आवाहन केले आहे. चिंतेची गोष्ट, म्हणजे या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणखी 144 जणांच्या रिपोर्टची प्रतिक्षा आहे. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. कोरोना विषाणू हा हवेमार्फत होणार रोग असल्याने कोरोना रुग्णाच्या अंत्यसंस्काराला जाणाऱ्या लोकांसाठी प्रशासनाकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. हे देखील वाचा- मुंबई: धारावीत आणखी 20 नवे कोरोनाबाधीत आढळले; आतापर्यंत 138 लोकांना संसर्ग तर, 11 जणांचा मृत्यू
नियमावली खालीलप्रमाणे-
-मृतदेहाला कुणीही स्पर्श करु नये.
-मृतदेहावर अंत्यविधी करताना पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी उपस्थित राहू नये.
-रुग्णालय प्रशासनाने कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृत्यूची माहिती आधी संबंधित पोलिस स्टेशनला द्यावी.
-मृतदेहाला कुणी स्पर्श करणार नाही आणि अंत्यविधीला पाचपेक्षा जास्त लोक उपस्थित राहणार नाहीत, याची खातरजमा झाल्यानंतरच मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करणे.
-अंत्यविधी करण्यात येणारे घाट किंवा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी मास्क, ग्लोव्ह आणि अन्य सुरक्षा साहित्यांचा वापर करणे अत्यावश्यक आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.