आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत (Dharavi) कोरोनाचे जाळे मोठ्या वेगाने पसरत चालले आहे. रविवारी दिवसभरात 20 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 138 वर पोहोचली आहे. तर कोरोनाबळींची संख्या 11 वर पोहोचली आहे.प्रशासनाकडून यापूर्वीच धारावी परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. येथील अनेक परिसर सील करण्यात आले आहेत. मात्र, तरीही धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. येथील मुस्लिम नगर आणि मुकूंदनगरमध्ये आतापर्यंत कोरोनाच सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत डॉक्टरांच्या पथकांकडून धारावीतील हजारो लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाचा संभाव्य धोका असलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. लवकरच धारावी परिसरातील नागरिकांच्या रॅपिड टेस्ट केल्या जाणार आहेत. मात्र, त्यासाठी लागणारी किटस् उपलब्ध न झाल्यामुळे अजूनही या टेस्टला सुरुवात झालेली नाही.
धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 3 हजार 648 वर पोहचली आहे. यापैंकी 211 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 365 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यातच धारावी परिसर अधिक मोठा असल्याने प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. येथील लोक घराबाहेर पडू नये, म्हणून या परिसरातील नागरिकांना दररोज सकाळी आणि रात्री प्रत्येकी जेवणाच्या पाकिटांचे वितरण, विविध धान्य आणि आवश्यक वस्तूंचा समावेश असलेल्या पाकिटांचे वाटप तसेच गरजवंतांना औषधांचाही पुरवठा करण्यात येत आहे. हे देखील वाचा- Coronavirus : पोलादपूरमधील 63 वर्षीय कोरोनाबाधीत महिलेचा मुंबईतील कस्तुरबा रूग्णालयात मृत्यू
मुंबई महानगर पालिकेचे ट्वीट-
20 new #Coronavirus positive cases reported in Dharavi of Mumbai. The total number of positive cases in the area increases to 138 (including 11 deaths): Brihanmumbai Municipal Corporation (BMC) pic.twitter.com/jcW5Awnq6M
— ANI (@ANI) April 19, 2020
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.