
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांमध्ये भितीजनक वातवरण निर्माण झाले आहे. यातच महाड पोलादपूरमधील 63 वर्षीय कोरोनाबाधीत महिलेचा मुंबई (Mumbai) येथील कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने शहरात शांतता पसरली आहे. या महिलेला 3 दिवसांपूर्वी महाड शहरातील आदित्य नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील कस्तूरबा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी तिचा मृत्यू झाल्याची बातमी पसरताच प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. तसेच ज्या परिसरात राहत होती, त्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोरोनाच्या विषाणूने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची लागण होऊन आतापर्यंत 211 लोकांचा मृत्यू झाला आहे.
संपूर्ण देशात लॉकडाउन असतानाही मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरांमध्ये वास्तव्यास असलेल्या महाड पोलादपूर तालुक्यातील चाकरमान्यांमुळे या दोन्ही तालुक्यात करोनाचा धोका निर्माण झाला असल्याची भीती सर्वत्र व्यक्त केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरांच्या ठिकाणाहून महाड पोलादपूर तालुक्यात सध्या स्थलांतर झालेल्या या चाकरमान्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे. हे देखील वाचा- लातूरकरांना मोठा दिलासा; 8 कोरोनाबाधित रुग्णांची दोन्ही चाचण्या निगेटिव्ह
कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत घट व्हावी म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. देशाचे सह आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत 40 टक्के घट झाल्याची माहिती दिली होती. तसेच 80 टक्के कोरोनाबाधीत रुग्ण कोरोनामुक्त होत असल्याचेही त्यांनी सांगितले होते.