
कोरोना विषाणूवरील (Coronavirus) उपचारासाठी शासनाने राज्यात कोविड सेन्टर्स उभारली आहे. याआधी अशा सेन्टर्समधून रुग्णांसोबत अनुचित प्रकार घडल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत, मात्र आता डॉक्टरांच्यासोबतही असे प्रकार घडत आहेत. ‘डॉक्टर’ या शब्दाला काळिमा फासणारी ताजी घटना नागपूर (Nagpur) येथे घडली आहे. इथे एका डॉक्टरने आपल्या सहकारी महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी केली, या महिलेने त्यासाठी नकार दिला असता पुरुष डॉक्टरने तिच्यावर बलात्कार (Rape) करण्याचा प्रयत्न केला. डॉ. नंदू रहांगडाले (39) असे या डॉक्टरचे नाव आहे.
ही घटना मानकापूर पोलीस ठाण्यांतर्गत एका रुग्णालयामध्ये घडली आहे. याबाबत डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात असलेल्या या रुग्णालयात कोविड केअर सेंटर आहे. काही दिवसांपूर्वीच या महिलेची ड्युटी येथे सुरु झाली होती. महिला या ठिकाणी नोकरीस लागल्यापासून नंदूची तिच्यावर वाईट नजर होती. ही महिला सोमवारी रात्री जेव्हा डॉक्टरांच्या केबिनमध्ये होती, तेव्हा आरोपी डॉक्टर तिच्या खोलीत आला आणि त्याने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. (हेही वाचा: मुंब्रा येथील रुग्णालयाला आग, 4 जणांचा मृत्यू; सीएम उद्धव ठाकरे यांच्याकडून मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख नुकसान भरपाई जाहीर)
महिला डॉक्टरने यासाठी नकार दिला असता आरोपीने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. महिला डॉक्टरने त्याला धक्का दिला व ती बाहेर पळून आली. नंतर तिने मानकापूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. याबाबत मानकापूर पोलिसांनी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैजयंती मांडवधारे यांच्या सूचनेवरून मानकापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
दरम्यान, याआधीही अजनी परिसरातील एका डॉक्टरने 19 वर्षांच्या नर्सबरोबर शारीरिक जबरदस्ती करण्याचा पर्यंत केला होता. एका आठवड्यातली ही दुसरी घटना आहे.