Nagpur: लग्नसमारंभातील जेवणामुळे वरासह 80 जणांना विषबाधा; तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल
Food Poisoning | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रातील नागपूर (Nagpur) येथे लग्नसमारंभात जेवण करणे पाहुण्यांना बरेच महागात पडले आहे. इथल्या रिसॉर्टमधील अन्न खाल्ल्यानंतर 80 जणांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांची प्रकृती खालावल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. नागपूर शहराच्या हद्दीतील एका रिसॉर्टमध्ये एका लग्न समारंभात संशयास्पद विषारी अन्न देण्यात आले होते, ज्यामुळे 80 लोक आजारी पडले.

ही घटना 10 डिसेंबर रोजी घडल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर वराच्या वडिलांनी रिसॉर्ट व्यवस्थापनाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यांनी आरोप केला की, समारंभात दिलेले जेवण शिळे होते आणि त्याला दुर्गंधी येत होती.

कमलेश्वर पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारदार कैलाश बत्रा यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी आणि रिसेप्शनसाठी 9 आणि 10 डिसेंबरला दोन दिवसांसाठी नागपुरातील अमरावती रोडवरील राजस्थानी गाव-थीम असलेले रिसॉर्ट बुक केले होते. या ठिकाणी वर आणि अनेक पाहुण्यांनी 9 डिसेंबरला रात्रीचे जेवण घेतल्यानंतर पोटदुखीची तक्रार केली. 10 डिसेंबरच्या दुपारी ही समस्या सुरू झाली. (हेही वाचा: Beed Shocker: लॉजवर प्रेयसीची हत्या, प्रियकराने स्वत:ही गळफास लावून संपवलं आयुष्य; बीड मध्ये नेमकं काय घडलं?)

त्या रात्री मेजवानीच्या वेळी परिस्थिती आणखीनच बिघडली कारण त्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणातून दुर्गंधी येत होती. मध्यरात्रीच्या सुमारास किमान 80 पाहुण्यांनी उलट्या झाल्याची तक्रार केली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले की, कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांना हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या व्यक्तींचे निवेदन नोंदवण्याचे आणि त्यांचे वैद्यकीय अहवाल गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्या आधारे रिसॉर्ट व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल.