Maharashtra Police (संग्रहित छायाचित्र)

कोविड-19 लॉकडाऊन (Covid-19 Lockdown) काळात घरबसल्या अनेकांनी विविध उद्योग केले, छंद जोपासले, नव्या गोष्टी ट्राय केल्या. मात्र नागपूर (Nagpur) मधील एका युवकाने चक्क बॉम्ब (Bomb) बनवला. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, राहुल पगारे (Rahul Pagare) (25) असे या युवकाचे नाव असून युट्युब व्हिडिओ (Youtube Video) पाहून त्याने बॉम्ब बनवला. मात्र या बॉम्बचा स्फोट झाल्यास त्याचे परिणाम भयानक असतील या भीतीने त्याने पोलिस स्टेशन गाठले. शनिवारी पोलिस स्टेशनमध्ये दाखल होत त्याने शरणागती पत्करली.  परंतु, टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या या बॉम्बचा कधीच स्फोट होणार नव्हता, असे पोलिसांनी सांगितले. (Bomb In Mantralaya Threat Call: मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या निनावी फोन कॉलमुळे खळबळ)

युट्युब व्हिडिओ पाहून बॉम्ब बनवणारा राहुल नंदनवन पोलिसांच्या ताब्यात आहे. नंदनवन पोलिस स्टेशन गाठल्यानंतर मला एक बॉम्बने भरलेली बॅग केडीके कॉलेजजवळ मिळाली आहे, असे राहुलने पोलिस अधिकाऱ्याला सांगितले. नंदनवन पोलिस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर यांना पगारेच्या सांगण्यात तथ्य वाटले नाही. कालांतराने राहुलने सत्य पोलिसांना सांगितले. बॉम्बचा स्फोट होण्यापूर्वी आपण पोलिसांच्या ताब्यात द्यावा, जेणेकरुन आपण मोठ्या संकटात अडकणार नाही, असे राहुलचे म्हणणे होते.

त्यानंतर नंदनवन पोलिसांनी बॉम्ब डिटेक्शन आणि डिस्पोजेबल स्कॉड यांना कळवले. ते पोलिस स्टेशनमध्ये पोहचताच त्यांनी बॉम्ब डिसमेंटल केला. या बॉम्बसाठी राहुलने एका प्लॉस्टिक बॉक्समध्ये फटाक्यांची राख, चायनीज मोबाईल फोन सर्किट, एक ब्लप आणि पेट्रोल ठेवले होते. यासोबतच मच्छर मारण्याचे मशिन आणि खेळण्यातल्या बॅटरीज वापरुन त्यावर रेड लाईट क्रिएट केली होती.

BDDS च्या तज्ञांनुसार, या बॉम्बमध्ये कोणताही डेटोनेटर किंवा जिलेटीन पदार्थ नव्हता, त्यामुळे या बॉम्बचा कधीच स्फोट झाला नसता. कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर इंटेलिजन्स एजन्सीज आणि अँटी टेररिस्ट स्कॉड देखील त्याची चौकशी करत आहेत.

दरम्यान, आई-वडीलांना गमावल्यानंतर राहुल भाड्याच्या घरात एकटाच राहतो. तो एका सलुनमध्ये काम करत होता. परंतु, लॉकडाऊनंतर उत्पन्नाचे साधन बंद झाल्यामुळे त्याला वारंवार घरं देखील बदलावी लागत होती. कोविड-19 निर्बंधांमुळे आणि उत्पन्न नसल्यामुळे राहुल खूप एकटा पडला होता.