Image used for representational purpose | (Photo Credits: ANI)

काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील महाड (Mahad) शहरातील 5 मजली इमारत कोसळली होती. या अपघातामध्ये तब्बल 16 जणांचा मृत्यू झाला आहे. आता दक्षिण मुंबईतील नागपाडा (Nagpada) परिसरातील इमारतीचा भाग कोसळ्याची दुर्घटना आज, गुरुवारी घडली. या अपघातामध्ये जखमी झालेल्या 12 वर्षीय लहान मुलीसह 70 वर्षीय महिलेचा जेजे रुग्णालयात मृत्यू झाला आहे. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख (Guardian Minister Aslam Shaikh) यांनी दिली आहे. गुरुवारी दुपारी झालेल्या या दुर्घटनेत एकुण 2 जण जखमी झाले आहेत.

शुक्लाजी रोडवरील स्थित असलेल्या मिश्रा इमारतीच्या टॉयलेटचा भाग दुपारी 1 वाजता कोसळला. घटनेबद्दल माहिती मिळताच मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करुन दुर्घटनाग्रस्तांची तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी निवाऱ्याची व्यवस्था करण्याचा निर्णय आठवड्याभरात घेण्याची ग्वाही श्री. शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिली. (हेही वाचा: भायखळा मधील मिश्रा इमारतीचा भाग कोसळल्याच्या दुर्घटनेत 12 वर्षीय मुलीसह 70 वर्षीय महिलेचा मृत्यू-BMC)

मुख्यमंत्री सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना अतिरिक्त मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनास सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासोबत आमदार अमिन पटेल व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. दुसरीकडे महाड येथील इमारत दुर्घटनेबाबत 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेली सामग्री अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी RCC Consultant बाहुबली धमाणे यास अटक केली आहे, तर नवी मुंबईतील डेव्हलपर फारूक काझी याचा शोध सुरू आहे. बुधवारी त्याच्या घराला कुलूप असल्याचे आढळले.