
सध्या कोरोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे मरण पावलेल्या लोकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण पाहायला मिळत आहे. याच भितीचा गैरफायदा घेत काही समाजकंटक नागरिकांची फसवणूक करत असल्याचे अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर नागपूर (Nagpur) येथील एका भोंदूबाबाने कोरोना बरा करण्याच्या नावाखाली अनेक नागरिकांना लुबाडले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना या नागोबा बाबाच्या भोंदूगिरीचा प्रकार कळल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) सापळा रचून या भोंदू बाबाला अटक केली आहे.
शुभम तायडे (वय, 32) असे अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. शुमभ हा पेशाने प्लंबर असून तो गेल्या दोन वर्षांपासून भोंदूगिरी करत होता. त्याच्या अंगात नाग संचारला की कोरोना बरा होतो, असा त्याचा दावा आहे. कोरोनाच्या उपचार व्यतिरिक्त पैशांचा पाऊस पाडणे, कौटुंबिक कलह दूर करणे, गुप्तधन शोधून देणे या नावावर देखील सामन्यांची फसवणूक करत होता. मात्र याने एका महिलेची फसवणूक केल्यानंतर हा प्रकार अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या कानावर आला. त्यांनतर त्यांनी शुभम विरोधात पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. यासंदर्भात न्यूज 18 लोकमतने माहिती दिली आहे. हे देखील वाचा- Mucormycosis: महाराष्ट्रातील म्युकरमायकोसीस रुग्णांच्या संख्येत वाढ, राजेश टोपे यांचे प्रशासनास निर्देश
नागोबा बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भोंदू बाबाचा दर गुरुवारी नागपूरच्या पंचशील नगरमध्ये दरबार भरायचा. त्याच्याकडे मोठ्या संख्येने रुग्ण देखील येत असल्याचे सांगितले जात आहे. चिंताजनक बाब म्हणजे, शुभमला अटक केल्यानंतर त्याला सोडवण्यासाठी त्याच्या अनेक भक्तांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. शुभम सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. तसेच त्याच्याविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणींनी जोर धरला आहे.
कोरोनाच्या भितीपोटी अनेक नागरिक अंधश्रद्धेला बळी पडताना दिसत आहेत. डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार न घेता अनेकजण अशा भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. ही अत्यतं चिंताजनक बाब आहे.