ओबीसी आरक्षण (OBC Reservation) सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केल्यानंतर राज्यातील जवळपास 30 जिल्ह्यांतील 93 नगरपंचायत निवडणुकीसाठी (Nagar Panchayat Election 2022) आज (18 जानेवारी) मतदान पार पडत आहे. नगरपंचायत निवडणुकींसोबतच भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीसाठीही (Zilla Parishad Elections) आज मतदान पडत आहे. भंडारा (Bhandara ) आणि गोंदिया (Gondia ) जिल्ह्यांसाठी अनुक्रमे 13 आणि 10 जागांसाठी मतदान पार पडते आहे. नगरपंचायत निवडणुकासाठी कालही मतदान पार पडले होते. आज उर्वरीत मतदान पार पडत आहे. कोरोना व्हायरस संसर्गाचे सावट असल्याने कोविड निडयमांचे काटेकोर पालन करतच या निवडणुका पार पडत आहेत. निवडणूक प्रचारातही कोरोना नियमांचे पालन करुनच उमेदवारांना प्रचार करावा लागला.
राज्यात एकूण 105 नगरपंचायतींसाठी निवडणूक पार पडत आहे. त्यापैकी काही नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबर पूर्वी मतदान पार पडले आहे. उर्वरीत नगरपंचायतींसाठी आज मतदान पार पडत आहे. या सर्व मतदानाची मतदोजणी उद्या पार पडणार आहे. दरम्यान, उर्वरीत 105 नगरपंचायतींपैकी 93 नगरपंचायतीच्या 336 जागांसाठी आज सकाळी साडेसात वाजलेपासून मतदानास सुरुवात झाली आहे. तसेच, 195 ग्रामपंचायतींमधील 209 रिक्त जागांसाठीही मतदान आजच पार पडते आहे. (हेही वाचा: UP Assembly Election 2022: राष्ट्रवादी काँग्रेस तीन राज्यात लढणार, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत आघाडी- शरद पवार.)
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केले आणि अनेकांना धक्का बसला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 106 नगरपंचायतींमधील ओबीसी प्रवर्गातील राखीव जागांसाठी एकूण निवडणूक प्रक्रियाच स्थगित करण्यात आली होती. आता ज्या ठिकाणी निवडणुका पार पडत आहेत त्या सर्व जागा खुल्या गटातील समजल्या जातील. ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्याने 27% जागा खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात आल्या होत्या. 21 डिसेंबरला झालेले मतदान आणि आज होणारे मतदान या सर्व मतदानांची मतमोजणी उद्या म्हणजेच 19 जानेवारी रोजी पार पडणार आहे.