Ulhasnagar: खळबळजनक! उल्हासनगर येथे अवघ्या 20 रुपयांसाठी एका तरुणाची हत्या
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

उल्हासनगर (Ulhasnagar) येथे अवघ्या 20 रुपयांसाठी एका तरुणाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी (22 मे) रात्री साडे दहाच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी अवघ्या दोन तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. मृत व्यक्ती आणि आरोपी ऐकमेकांना ओळखत असल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे.

अनिल आहुजा असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. अनिल हा उल्हासनगरच्या जय जनता कॉलनीत राहायला असून एका चहाच्या दुकानात तो कामाला होता. रविवारी आरोपी साहिल मैराळे हा एका गल्लीत गांजा पीत होता. यावेळी तिथून जात असलेल्या अनिलकडे त्याने 20 रुपये मागितले. मात्र, अनिल याने त्याला पैसे द्यायला नकार दिल्याने साहिल याला राग आला. त्याने त्याच्या कमरेला असलेला चाकू काढून अनिलवर सपासप वार केले. यात अनिल गंभीर जखमी झाला. त्यानंतर तातडीने मध्यवर्ती जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. हे देखील वाचा- Vijay Patil Passes Away: ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील यांचं निधन; पांडू हवालदार, मैने प्यार किया, हम आपके है कौन यांसह अनेक दर्जेदार चित्रपटांना दिलेलं संगीत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आरोपीला कॅम्प 4 च्या परिसरातून ताब्यात घेतले. त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला पोलिसांना चाकू आढळला. त्याच्याविरोधात भा.दं. वि. कलम 302, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नुकतीच हाती आलेल्या माहितीनुसार, नागपूर येथे वेगाने गाडी चालवण्याच्या वादावरून एका तरूणाची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघांना अटक करण्यात आला आहे. तर, एकजण फरार असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.