Crime | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

चोरीचा गुन्हा लपण्यासाठी एका तरूणाने 9 वर्षाच्या मुलाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ही घटना नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सामनगाव (Samangaon) येथे मंगळवारी घडली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या एका तरुणाला अटक केली असून त्याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने संपूर्ण नाशिक हादरून गेले आहे. आरोपीने काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला लुटले होते. हा प्रकार मृताने पाहिला होता. यामुळे आपण केलेल्या चोरीची कुठे वाच्यात होऊ नये, या भीतीने तरूणाने चिमुकल्याची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशीला सुरुवात केली आहे.

रामजी लालबाबू यादव, मृत मुलाचे नाव आहे. रामजी यांच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने काही दिवसांपूर्वी एका प्रवाशाला सिन्नर इथे सोडतो म्हणून गाडीत बसवले होते. त्यानंतर काही अंतर दूर गेल्यावर त्याने प्रवाशाकडून त्याचा मोबाइल फोन आणि 4 हजार रुपये लूट केली होती. हा सर्वप्रकार रामजी याने पाहिला होता. दरम्यान, आपण केलेली लूट कोणालाही सांगू नको, अशी धमकीही त्याने रामजीला त्यावेळी दिली होती. परंतु, रामजी यासंदर्भात कुठे तरी वाच्याता करेल, अशी भिती संबंधित तरुणाला होती. यामुळे रामजीला बाहेर फिरायला घेऊन जातो सांगून डुबेरे गावातील बंधार्‍यावर घेऊन गेला आणि गळा दाबून त्याचा खून केल्याची माहिती न्युज 18 लोकमतने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Pimpri Murder: खळबळजनक! आधी धारदार शस्त्र भोकसून केली हत्या; मग पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहच टाकला जाळून

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामजी मंगळवारपासून बेपत्ता झाला होता. यामुळे त्याच्या पालकांनी शाळेत, नातेकवाईकांकडे चौकशी केली. पण त्याचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. परंतु, दुपारी आरोपीने आपल्या मुलगा रामजीला बरोबर नेल्याचे पालकांनी पाहिले होते. त्यानंतर आरोपी रात्री उशीरा घरी पोहचल्यानंतर रामजीच्या पालकांनी त्याच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिले. यातून संशय आल्याने पालकांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी त्याची चौकशी केली. सुरुवातीला त्याने हा फेटाळण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने या खुनाची कबुली दिली.