Mumbai Local Updates: आजपासून मुंबईच्या पश्चिम आणि मध्य मार्गावर धावणार अतिरिक्त लोकल ट्रेन्स; जाणून घ्या कोणाला आहे प्रवासाची मुभा
Mumbai Local (Photo Credit - PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल (Mumbai Local) सेवा मर्यादीत स्वरुपात सुरु होती. परंतु, आजपासून (29 जानेवारी) मध्य रेल्वे (Central Railway) आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावर अतिरिक्त लोकल ट्रेन्स धावणार आहेत. मात्र अद्याप सर्वांना लोकलने प्रवास करण्याची अनुमती देण्यात आलेली नाही. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि महिलांनाच प्रवासाची मुभा आहे.

आजपासून 2,781 ट्रेन्स ऐवजी 2,985 ट्रेन्स उपलब्ध होणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल गाड्यांची संख्या 1,580 वरून 1,685 करण्यात आली आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून 1,201 ऐवजी 1,300 लोकल्स धावणार आहेत. (Mumbai Local Train: लवकरच मुंबई लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु होण्याची शक्यता; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला विविध पर्यायांचा आढावा)

कोणाकोणाला आहे प्रवासाची मुभा?

कोविड-19 चे संकट अद्याप टळलेले नसल्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवेतील लोक आणि महिलांनाच मुंबई लोकलने प्रवास करण्याची अनुमती देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील लोक, वकील, महिला, शिक्षक, नॉन टिचिंग स्टाफ यांनाच मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे. याशिवाय अपंग, कॅन्सर रुग्ण देखील लोकलसेवेचा लाभ घेऊ शकता. दरम्यान, अद्याप विद्यार्थ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा सुरु करण्याचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. परंतु, लोकल ट्रेन्सच्या संख्येता वाढ करण्यात आली आहे. तसंच सर्वसामान्यांसाठी सेवा सुरु करण्यासाठी विविध पर्यायांचा देखील विचार केला जात आहे. त्यामुळेच अनलॉकच्या पुढच्या टप्प्यात सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु होण्याची शक्यता आहे.