मुंबई मध्ये 27 जानेवारीपासून मॉल, उपहारगृह 24x7 सुरू ठेवण्यास परवानगी; पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा निर्णय
Mumbai Night | Photo Credits: Pixabay.com

मुंबई हे शहर 24 x7 जागं असतं अशी ओळख आहे. आता महाविकास आघाडी सरकारने मुंबईमध्ये मॉल, हॉटेल्स, उपहारगृहं आता मुंबईकरांच्या सेवेसाठी 27 जानेवारी पर्यंत खुलं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काल (16 जानेवारी) राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी 'सह्याद्री' या शासकीय विश्रामगृहावर याबाबतचा निर्णय घेतला आहे. पोलिस कमिशनर संजय बर्वे (Sanjay Barve) यांच्यासह झालेल्या मिटिंगमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, मुंबईमध्ये आता बीएमसी आणि मुंबई पोलिस यांनी अनिवासी भागामधील आणि गेटेड कम्युनिटीज यांच्यामधिल मॉल आणि हॉटेल्स खुली ठेवली जाणार आहेत. या निर्णयाला बीएमसी कमिशनर प्रविण पदरेशी यांनी परवानगी दिली आहे. मात्र सुरूवातीला ही परवानगी केवळ 2-3 वाजेपर्यंतच असेल. तसेच मध्यरात्री दीड नंतर मद्यपानास परवानगी नसेल.

सरकारी अधिकार्‍यांसोबत झालेल्या मीटिंगमध्ये शॉपिंग मॉल, हॉटेल्स आणि रेस्ट्रॉरंटचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. दरम्यान मुंबईमध्ये 25 मॉल आणि इतर शॉप्स, रेस्ट्रॉरंट 24 x7 उघडी राहू शकतात मात्र त्याचा निर्णय मालकांना घ्यायचा आहे. Gated communities म्हणजे ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा, पार्किंग फॅसिलिटी आहे, आवाजाचं प्रदुषण नसेल, लोकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाऊ शकते असे ठिकाण. मुंबईमध्ये संपूर्ण आठवडाभर 24 तास मॉल आणि हॉटेल्स उघडी राहू शकत नसली तरीही मॉल मालकांनी किमान विकेंडला ती ओपन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कमला मिल परिसरात 24 x7 मॉल्स आणि इतर शॉप्स,आस्थापनं उघडी ठेवण्यास परवानगी आहे. वर्षभरापूर्वीच सरकारने या निर्णयाला परवानगी दिली होती त्यामुळे आता 27 जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी होऊ शकते.