आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईत तांत्रिक कारणामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे विरारकडून चर्चेगेटच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या तब्बल 15 ते 20 मिनिटं उशीराने धावत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याने भल्यापहाटे कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहेत. कार्यालयीन वेळी पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळित झाल्याने कामाला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. ट्रेन उशीराने धावत असल्याने स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी ही पहायला मिळत आहे. (हेही वाचा - IIT Bombay: कँटीनमध्ये फक्त शाकाहारींनाच बसण्याची परवानगी, नॉनव्हेज पोस्टर्सवरून विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ)
दरम्यान तांत्रिक कारणामुळे काही लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्याने कामावर निघालेल्या चाकरमान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडून लोकल सेवा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचवेळी मुंबईसह उपनगरातील काही भागात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची मोठीच तारांबळ उडालेली पहायला मिळत आहे.
आठवड्याचा पहिला दिवस असल्याने अनेकांना कार्यालयात पोहचण्यासाठी विलंब तर होत आहेच पंरतू पावसामुळे आणखी मनस्ताप हा सहन करावा लागत आहे. अनेक नागरिकांनी यावेळी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर नाराजी ही व्यक्त केली आहे. रविवारी मेगाब्लॉक घेऊन देखील हा तांत्रिक बिघाड कसा होऊ शकतो असा प्रश्न देखील विचारला आहे.