AC Local | (Photo Credits: Twitter)

मुंबईमध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर चालवल्या जाणार्‍या पश्चिम रेल्वेच्या फेर्‍यांमध्ये आता वाढ करण्यात येणार आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार जानेवारी 2020 च्या अखेरीपर्यंत आता पश्चिम रेल्वे 8 नव्या वातानुकुलित फेर्‍या चालवणार आहे. यामुळे मुंबईकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. आठ पैकी सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये गर्दीमध्ये प्रत्येकी एक फेरी चालवली जाणार आहे. तर उरलेल्या सहा फेर्‍या दुपारी चालवल्या जाणार आहेत. अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. Mumbai AC Local: ट्रान्स हार्बर येथील ठाणे ते पनवेल मार्गावर धावणार पहिली एसी लोकल.

पुढील 2 आठवड्यामध्ये अतिरिक्त वातानुकुलित फेर्‍यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला जाईल. तसेच चर्चगेट आणि विरार दरम्यान या नव्या एसी लोकल चालवल्या जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक जी. व्ही. एल सत्यकुमार यांनी महाराष्ट्र टाईम्सशी बोलताना सांगितले आहे.

सुरूवातीच्या टप्प्यामध्ये चर्चागेट ते वांद्रे या पश्चिम रेल्वेच्या स्थानकांदरम्यान अतिरिक्त फेर्‍या चालवल्या जातील असा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र तो रखडला. सध्या पश्चिम रेल्वेकडे चार एसी लोकल आहेत. त्यापैकी एक दुरूस्तीसाठी आहे. 2 लोकलची चाचणी सुरू आहे तर अन्य एक लोकल पश्चिम रेल्वेवर धावत आहे.

येत्या काही दिवसामध्ये पश्चिम रेल्वे प्रमाणेच मध्य रेल्वेमार्गावर देखील ट्रेन चालवली जाणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर मध्य रेल्वेकडून पहिली ट्रेन चालवली जाणार आहे असे मीडीया रिपोर्ट्सकडून सांगण्यात आले आहे. सध्या ही लोकल मुंबईमध्ये दाखल झाली आहे.