Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. पावसाने मराठवाडा व विदर्भाला झोडपल्यानंतर आता मुंबई (Mumbai) व ठाणे (Thane) परिसरात पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान ब्युरोने रविवारी, मुंबई व ठाणे परिसरात सोमवार व मंगळवारसाठी ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) - अतिवृष्टीचा इशारा जारी केला. या काळात शहर व उपनगरासह गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान खात्याने (IMD) सांगितले आहे. दुसरीकडे येत्या दोन ते तीन दिवसात द.कोकण (रत्नागिरी, सिंदुदुर्ग), गोवा सह बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ईशान्य बंगालच्या उपसागरात रविवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे, 19-22 सप्टेंबर च्या दरम्यान महाराष्ट्रात विविध भागात पाऊस वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे, खालच्या स्तरावरील पश्चिम दिशेचे वारे आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. आयएमडीचे उप-महासंचालक के एस होसाळीकर यांनी याबाबत सांगितले.

होसाळीकर पुढे म्हणाले, 'कोकण आणि गोवा येथे मान्सूनची सक्रिय स्थिती अपेक्षित होती. येत्या काही दिवसांत दक्षिण कोकणच्या दुर्गम भागात अति मुसळधार आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उर्वरीत महाराष्ट्र आणि उत्तर कोकणातील काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: येत्या 2 ते 3 दिवसात रत्नागिरी, सिंदुदुर्ग तसेच राज्यातील इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता)

दरम्यान, शनिवारी दक्षिण मुंबईपेक्षा उपनगरामध्ये अधिक पाऊस पडला, तर उत्तर उपनगरातील काही भागात मुसळधार पावसाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे 12.4 मिमी तर कुलाबा येथे सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 दरम्यान 2 मिमी पावसाची नोंद झाली. याच काळात भाईंदर येथे 89 मिमी, मीरा रोड येथे 46 मिमी इतका पाऊस नोंदविण्यात आला. मालाडमध्ये 29.4 मिमी तर वांद्रे येथे 13.4 मिमी नोंद झाली. रविवारी हलका ते मध्यम पाऊस किंवा गडगडाटी पावसाची शक्यता असणाऱ्या ढगांचा अंदाज वर्तविला गेला आहे.