
IMD Weather Update Mumbai: मुंबई शहर, उपनगरे आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात ( India Heatwave April 2025) लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड (Raigad Heat Alert) जिल्ह्यांसाठी पिवळा इशारा (IMD Yellow Alert) दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सध्या सुरू असलेली उष्णतेची लाट ही गुरुवारनंतर थोड्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट असून, चंद्रपूर येथे सोमवारी 45.6°C तापमान नोंदवले गेले आहे. तरीही मुंबईत तुलनेने सौम्य हवामान राहिले आहे. सोमवारी सांताक्रूझ आणि कुलाबा वेधशाळांमध्ये सुमारे 33.5°C इतके सामान्य कमाल तापमान नोंदवण्यात आले.
दरम्यान, आयएमडीने हवामान अंदाजादरम्यान मुंबई शहरातील किमान तापमान मंगळवारी (22 एप्रिल) हंगामी सरासरीपेक्षा कमी नोंदवले गेले. सांताक्रूझ येथे 23.5°C तापमान नोंदले गेले, जे हंगामी सरासरीपेक्षा 1.4 अंशांनी कमी होते. तसेच, आर्द्रतेच्या पातळीतही 6% घट झाली असून, मंगळवारी सकाळी ती 65% च्या आसपास होती. (हेही वाचा, Mumbai Weather Update: मुंबईमध्ये आकाश निरभ्र, उपनगरांमध्ये उष्ण आणि दमट हवामान)
तापमान वाढीचे कारण काय?
हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या उत्तर-पश्चिम वारे राज्यावर प्रभावी असून त्यामुळे तापमान नियंत्रणात आहे. पण गुजरात, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश येथून येणारे उत्तर वारे पुढील दोन-तीन दिवसांत राज्यात पोहोचण्याची शक्यता असून त्यामुळे तापमानात वाढ होईल.
महेश पलावत, उपाध्यक्ष (हवामानशास्त्र), Skymet Weather Services यांनी सांगितले की, “सध्या समुद्रावरून येणाऱ्या उत्तर-पश्चिम वाऱ्यांमुळे मुंबईचे तापमान मर्यादेत राहिले आहे. मात्र आता गुजरात, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून उष्ण उत्तर वारे मुंबईकडे येणार आहेत, त्यामुळे तापमानात वाढ होणार आहे.”
उष्णतेचा पिवळा इशारा (यलो अलर्ट) काय काय सांगतो?
- मुंबई: मंगळवारी पिवळा इशारा, आणि मंगळवार ते बुधवार दरम्यान तापमान 36°C पेक्षा जास्त होण्याची शक्यता.
- ठाणे आणि रायगड: बुधवारीपर्यंत पिवळा इशारा कायम, तापमान 39°C पर्यंत जाण्याचा अंदाज.
- पालघर: आर्द्रता आणि उष्णतेमुळे अस्वस्थता वाढण्याची शक्यता, त्यामुळे पिवळा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबईसाठी उष्णतेच्या लाटेची औपचारिक घोषणा नसतानाही, आयएमडीने नागरिकांना हायड्रेटेड राहण्याचे, जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहण्याचे टाळण्याचे आणि दुपारच्या वेळी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. गुरुवारनंतर, तापमान किंचित कमी होऊन सुमारे ३४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे उष्णतेपासून काही प्रमाणात आराम मिळेल.