
मुंबई (Mumbai) मध्ये यंदा उन्हाळा (Summer) सुरू होण्यापूर्वीच उन्हाचे चटके बसण्यास सुरूवात होणार आहे. सध्या मुंबईचा साठा 50% पेक्षा कमी झाल्याने आता मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट (Water Cut) घोंघावत आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार महिना अखेरीपासून पालिकेकडून पाणी कपात जाहीर केली जाऊ शकते. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणार्या सात तलावांमध्ये 49.37% पाणीपुरवठा आहे. ही मागील 3 वर्षातील सर्वात कमी पाणीपातळी आहे.
यंदा उन्हाळापूर्वीच बाष्पीभवन वेगात होत असल्याने आणि हवामान तज्ञांच्या माहितीनुसार उन्हाळाही कडक असल्याने पाणी कपातीचं संकट दाट आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी मुंबईचा पुरवठा 54.89 % होता. तर 2022 मध्ये तो 57.39% होता.
बीएमसी चे अधिकारी P Velrasu यांनी मुंबईकरांना महिनाअखेरीपासून पाणी कपातीला नागरिकांना सामोरं जाऊ शकतं असा अंदाज इंडियन एक्सप्रेस सोबत बोलताना व्यक्त केला आहे. पालिकेकडून पाटबंधारे विभाग कडून पिण्याच्या पाण्यासाठी अधिक तरतूद केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे. जर संबंधित विभागाकडून तशी अधिकची पाणी देण्याची तरतूद झाली नाही तर पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागेल.
सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात यंदा कमी पाऊस झाला. पाऊस कमी झाला तसेच मान्सूनची एक्झिट देखील नियोजित दिवसापेक्षा 4 दिवस आधी झाल्याने हे पाणी संकट निर्माण झाले.
हवामान तज्ञांच्या माहितीनुसार, सध्या El Nino चा प्रभाव आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही उष्माघाताचा त्रास आहे. मुंबई मध्ये यंदाचा हिवाळा देखील उष्ण आहे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन अधिक वेगाने होत असल्याचे ते म्हणाले. Mumbai Water Tax: मुंबईमध्ये पाणी करात 8 टक्क्यांची वाढ; BMC प्रशासनाने दिली मंजुरी .
Skymet Weather Services चे महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार “अल निनो वर्ष साधारणपणे जास्त उष्ण असतात आणि त्यामुळे हा उन्हाळा अधिक कडक होऊ शकतो. तापमान सामान्यपेक्षा थोडे जास्त राहील आणि संपूर्ण भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.”