पिसे उदंचन केंद्रात दुरुस्तीचे काम सुरु असल्याने पालिकेकडून मुंबई परिसरात 3 ते 9 डिसेंबर या काळात, 10 टक्के पाणी कपात (Mumbai Water Cut) केली जाणार होती. मात्र येत्या 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. या निमित्ताने हजारोंच्या संख्येने अनुयायी मुंबई दाखल होतात. याच गोष्टीचा विचार करून महापालिकेने ही पाणीकपात पुढे ढकलली आहे. आता 7 ते 13 डिसेंबर या कालावधीत पाणीकपात केली जाणार आहे. बाबासाहेबांच्या अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून, दररोज 3958 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र गळती, चोरी अशा कारणांमुळे यातील 27 टक्के पाणी वाया जाते. त्यामुळे पालिकेकडून जलवाहिन्या दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पिसे उदंचन केंद्रामधील न्युमॅटिक गेट सिस्टीमची दुरुस्ती करण्यात येणार आहे. हे काम आठवडाभर चालणार आहे. त्यामुळे महापालिकेने 10 टक्के पाणी कपातीची घोषणा केली होती. (हेही वाचा: 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; पहा वेळापत्रक)
मात्र महापरिनिर्वाण दिनाचा विचार करता, समन्वय समितीनेही सोमवारी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेऊन ही पाणीकपात पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता पालिकेने 7 ते 13 डिसेंबर दरम्यान पाणीकपात होणार असल्याचे जाहीर केले आहे. या काळात नागरिकांनी पाण्याचा पवार जपून करावा असे आवाहन करण्यात आले आहे.