मुंबई: वाडिया हॉस्पिटल प्रकरणी आज महत्त्वपूर्ण बैठक; स्पष्ट होणार भवितव्य
Wadia Hospital (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्र राज्य सरकार आणि महानगर पालिका यांच्याकडून मुंबई मधील परेल भागात असलेल्या वाडिया रूग्णालयाला थकीत अनुदान देण्यामध्ये होत असलेल्या दिरंगाईमुळे सध्या वाडियाची Nowrosjee Wadia Maternity Hospital  आणि Bai Jerbai Wadia Hospital of Children दोन्ही हॉस्पिटल बंद होण्याच्या वाटेवर आहेत. दरम्यान सरकार आणि हॉस्पिटल प्रशासनामधील या विसंवादाचा फटका सामान्य रूग्णांना बसत असल्याने आता यावर तोडगा काढण्यासाठी आज मुंबईमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्या अध्यक्षतेखाली आज (14 जानेवारी) महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. दरम्यान त्यानंतर वाडीया हॉस्पिटलचे भवितव्य स्पष्ट होणार आहे. मुंबई: राज्य सरकार आणि महापालिकेकडून येणारा निधी थकल्याने वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या वाटेवर

मीडीया रिपोर्ट्सनुसार मुंबई महानगरपालिकेकडून 135 कोटींचे अनुदान बाकी आहे. तर पालिका असा दावा करत आहे की त्यांच्याकडून केवळ 20 कोटी देणे शिल्लक आहे. सध्या या आरोप-प्रत्यारोपामध्ये रूग्णांचे हाल होत आहेत. दरम्यान आज मनसेचे शिष्टमंडळ देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहे. दरम्यान हॉस्पिटल कडूनही सध्या प्रकरण मुंबई उच्च न्यायालयासमोर असल्याचं म्हटलं आहे.

पालिका व राज्य शासनाने अनुदान दिलेले नाही, हे कारण देत व्यवस्थापनाने वाडिया हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना वेतन दिलेले नाही. या प्रकरणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी पुढे आलेली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी या आंदोलनाला पाठिंबा दाखवला आहे.