Arrested | Representational Image | (Photo Credits: Facebook)

मुंबई (Mumbai) मधील बांद्रा-वरळी सी-लिंकवर (Bandra-Worli Sea Link) स्टंट्स करणाऱ्या दोन रशियन नागरिकांना (Russian Nationals) पोलिसांनी अटक केली आहे. मॅक्सिम शचेरबाकोव्ह (24) आणि वासिली कोलेसेनिकोव्ह (30) अशी या दोघांची नावे असून स्टंटबाजीचा प्रकार बुधवारी घडला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (कांदिवली च्या एका टोलेजंग इमारतीच्या सज्जावर खाली डोकं वर पाय करुन तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल)

अटक करण्यात आलेले दोघे बांद्रा वरुन टॅक्सी करुन सी-लिंकवर आले. सी-लिंकवर काही काळ चालल्यानंतर मॅक्सिम हा सी-लिंकच्या लोखंडी गजांवर चढू लागला. त्यावेळी वासिली खाली उभा राहून त्याचे फोटोज आणि व्हिडिओज काढत होता. सी-लिंकवरुन जाणाऱ्या लोकांनी हे पाहिले आणि सी-लिंक मॅनेजमेंटच्या अधिकाऱ्यांना त्यांनी याबद्दल माहिती दिली. यानंतर पोलिसांना तात्काळ कळवण्यात आले. पोलिस घटनास्थळी पोहचताच त्या दोघांनाही अटक करण्यात आली, अशी माहिती वरळी पोलिस स्टेशन सिनियर इन्स्पेक्टर अनिल कोळी यांनी दिली.

आयपीसी कलम 336 आणि 188 अंतर्गत या दोघांनाही अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना कोर्टासमोर सादर करण्यात आले. कोर्टाने 7500 रुपयांच्या जामिनावर दोघांचीही सुटका केली आहे. "हे दोघेही सर्कसमध्ये काम करत असून अशाप्रकारच्या उंच ठिकाणी चढून वेगवेगळे स्टंट्स करुन त्याचे फोटोज आणि व्हिडिओज ते सोशल मीडियावर पोस्ट करत असतात," असे चौकशी दरम्यान समोर आले असल्याचे कोळी यांनी सांगितले.

मुंबईतील अँटी टेरर सेलने देखील या दोघांची चौकशी केली असून त्या दोघांकडेही काही संशयास्पद आढळून आले नाही. दरम्यान, पोलिस सोमवारी या दोघांविरुद्ध चार्जशिट दाखल करणार आहेत, असे अनिल कोळी यांनी सांगितले.