मुंबई (Mumbai) येथे 9 लाखाहून अधिक फॉलोअर्स असलेल्या टिकटॉक स्टारला चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. 19 डिसेंबर रोजी अंधेरी (पश्चिम) येथील मॉडेल-अॅक्टरच्या फ्लॅटमधून 4.9 लाख रोख रक्कम व सोन्याची चोरी केल्याबद्दल 2 जानेवारी रोजी अभिमन्यु गुप्ता (Abhimanyu Gupta) या टिकटॉक स्टारला ताब्यात घेतले. चोरीच्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलिसांनी इमारतीमध्ये लावलेले सीसीटीव्ही बारकाईने पाहिले त्यावेळी अभिमन्युवरील त्यांचा संशय बळावला होता. गुप्ता याला कोणत्या ना कोणत्या गुन्हामध्ये 2011 पासून नेहमीच अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी इंस्टाग्रामवर आरोपी अभिमन्यू गुप्ता आणि पीडिता खुशबू अग्रवाल यांची ओळख झाली होती. याच ओळखीच्या आधारे गुप्ता याने खुशबूला आपले भाड्याचे घर मिळेपर्यंत तिच्या घरी राहण्याची विनंती केली. गुप्ताला फक्त 12-13 दिवस राहायचे असल्याने खुशबूनेही त्याला परवानगी दिली.
आता खुशबू अग्रवालने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘मी गुप्ताला माझ्या घरात राहू दिले. जेव्हा चोरी झाली तेव्हा मी कामाच्यानिमित्ताने 18 ते 22 डिसेंबर दरम्यान भारताबाहेर होते. माझे दागिने आणि रोकड जगावरून गायब असून घरात चोरी झाली असल्याचे 1 जानेवारी रोजी माझ्या लक्षात आले. गुप्ताने मला याबाबत पोलिसांकडे तक्रार करू नये असे सांगितले होते. पोलिस माझ्या मित्रांना त्रास देतील असे त्याचे म्हणणे होते, परंतु, मी त्याच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल केली.’ (हेही वाचा: Mumbai: अक्सा बीचवर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचा मुंबई पोलिसांनी वाचवला जीव)
त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संशयित व्यक्ती बुरखा घालून आली असल्याचे आढळले. त्या व्यक्तीच्या पायात जेन्ट्स बूट होते. पोलिसांनी त्याच्या चालण्याची पद्धत बारकाइने बघितली असता, ती अभिमन्यूसोबत मिळतीजुळती होती. याच्याच आधारे गुप्ताला अटक करून, त्याच्या दुचाकीच्या सीटखाली लपवून ठेवलेला चोरीचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला. गुप्तानेही केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.