शिर्डी पाठोपाठ नवी मुंबई आणि नागपूर मध्ये हत्याकांड, पोलीस तपास सुरु
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

नवी मुंबई: तुर्भे (Turbhe) MIDC मधील इंदिरा नगर (Indira Nagar) परिसरातील बोनसरी गावात आज सकाळी, भंगाराच्या गोदामातील तीन कामगारांची हत्या झाली आहे. या घटनेत राजेश (28 वर्ष), इर्शाद (24 वर्ष) तर नौशाद या 14 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गोदामतील भंगाराच्या चोरीच्या उद्देशानं त्यांची हत्या झाल्याचे  दिसून येत आहे. या परिसरात अनधिकृतपणे चालत असलेल्या भंगाराच्या गोदामामध्ये हा प्रकार घडला. डोक्यात जड वस्तू घालून तसंच चाकूचे वार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर त्यांचे मृतदेह त्याच ठिकाणी लपवण्यात आले होते. याबाबत नवी मुंबई पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या तीनही मृतांचे शरीर पोस्टमार्टम साठी जवळील रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत.

ANI ट्विट

दरम्यान, नागपूर येथील सावली फाटा जवळ पोलिसांना एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळला होता.या तरुणीच्या तोंडावर ऍसिड फेकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच हल्लेखोरांनी या तरुणीचा एक हात तोडून टाकला होता.यामुळे तिचा चेहरा विद्रुप केल्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टम नंतर या प्रकरणाचा उलगडा होऊ शकतो.

राज्यात हत्याकांडाची  दिवसभरातील ही तिसरी घटना आहे, आज सकाळीच अहमदनगर येथील शिर्डी मध्ये एकाच कुटुंबातील तिघांची किरकोळ वादावरून हत्या करण्यात आली होती. त्यापाठोपाठ लगेचच,  या दोन घटना समोर  आल्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.