Maharashtra Aseembly Elections 2019: मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यात तृतीयपंथी मतदारांची सर्वाधिक नोंद; पुरुष व महिला मतदार नोंदणीत पुणे अव्वल
Voting In India | (Photo Credit: Archived, edited, representative images)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे (Maharashtra Assembly Elections 2019) बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीचा आरंभ केला आहे. अशातच काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगातर्फे 21 ऑक्टोबर रोजी मतदान व 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या निवडणूक प्रवासातही जितके राजकीय कार्यकर्ते उत्साही आहेत तितकेच मतदार सुद्धा सज्ज झाले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी करण्यात येणाऱ्या मतदार नाव नोंदणी प्रक्रियेत पुणे (Pune)  येथे सर्वाधिक महिला व पुरुष मतदारांची नोंदणी झाल्याचे समजत आहे तर मुंबई उपनगर व ठाणे (Thane) जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात तृतीयपंथी मतदारांनी नाव नोंदवले आहे.

महाराष्ट्र परिचय केंद्र या शासनाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून याबाबात माहिती देण्यात आली आहे. यानुसार राज्यात ३१ ऑगस्ट २०१९ रोजी पर्यंतच्या आकडेवारीनुसार, मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण 527 तृतीयपंथी मतदार, ठाणे जिल्ह्यात 460 आणि पुणे जिल्ह्यात 228 तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे. (मतदार यादीत तुमचे नाव कसे तपासाल, जाणून घ्या सोप्प्या स्टेप्स)

महाराष्ट्र परिचय केंद्र Tweet 

दुसरीकडे पुणे जिल्हा हा महिला व पुरुष मतदारांच्या नाव नोंदणीत अव्वल असल्याचे समजत आहे. पुणे जिल्ह्यात, एकूण 40 लाख 19 हजार 664 पुरुष मतदार तर 36 लाख 66 हजार 744 महिला मतदार नोंदणी झाली आहे, तर मुंबई उपनगरांत ही आकडेवारी एकूण 39 लाख 29 हजार 232 पुरुष मतदार तर 32 लाख 97 हजार 067 महिला मतदार इतकी आहे. याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यात एकूण 34 लाख 47 हजार 148 पुरुष मतदार आणि 28 लाख 81 हजार 777 महिला मतदार आहेत.

प्राप्त माहितीनुसार, मुंबई, पुणे, मुंबई उपनगर व ठाणे जिल्हा पकडून अन्य राज्यभरात झालेली सरासरी नोंदणी पाहता, 4 कोटी 67 लाख 37 हजार 841 पुरुष मतदार, 4 कोटी 27 लाख 5 हजार 777 महिला तर 2 हजार 593 तृतीयपंथी अशा एकूण 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 मतदारांची नोंदणी झाली आहे.